पालघर : पालघर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या वतीनं माजी खासदार राजेंद्र गावित यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांचा शिवसेना पक्षात शनिवारी प्रवेश झाला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपानं हा मतदारसंघ शिवसेनेकडून ताब्यात घेतल्यानं गावित यांना थांबावं लागलं होतं. त्यावेळी भाजपानं त्यांचा पक्षप्रवेश करून घेऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा शब्द दिला होता. मात्र, भाजपाकडून पालघर जिल्ह्यातील एकाही विधानसभा मतदारसंघातून त्यांचं पुनर्वसन होण्याची शक्यता दिसत नसल्यानं त्यांनी पुन्हा शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं त्यांना पालघरमधून उमेदवारी मिळण्यावरही शिक्कामोर्तब झाला आहे.
शनिवारी केला पक्षप्रवेश : शिवसेनेत फूट पडल्यानंतर गावित यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. लोकसभेत उमेदवारी मिळत नसतानाही त्यांनी बंड केलं नाही. एकनाथ शिंदे यांना विचारूनच ते भाजपात गेले. आताही भाजपात पुनर्वसन शक्य नसल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांशी चर्चा केलीय. महायुतीसाठी एक-एक जागा महत्त्वाची असल्यानं गावित यांच्या शिवसेना प्रवेशाला भाजपाचीही संमती होती, अशी चर्चा होती. शनिवारी गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून, त्यांची उमेदवारीही जाहीर झाली आहे.
वनगा यांची काढली समजूत : पालघर विधानसभा मतदारसंघातून गेल्या वेळी शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा निवडून आले होते. शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनीही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्याबाबत पालघर विधानसभा मतदारसंघात नाराजी होती. शिंदे यांच्यासाठी पालघर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं शिंदे यांनी वनगा यांना बोलावून पुनर्वसन करण्याचा शब्द दिल्याची माहिती मिळाली आहे.