मुंबई- देशात सर्वात समृद्ध राज्य असलेल्या महाराष्ट्रात बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडलंय. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मजबूत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केलेत, तर शिवसेना- एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी-अजित पवार, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी-शरद पवार यांनीही यासाठी जोरदार प्रचार केलाय. त्याचा निकाल उद्या म्हणजे 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभेत एकूण 288 जागा आहेत, त्यापैकी 234 सर्वसाधारण, 29 अनुसूचित जाती (एससी) आणि 25 अनुसूचित जमाती (एसटी) साठी राखीव आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा या राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आपापल्या पक्षांचा आणि आघाडीचा विजय सुनिश्चित करण्यासाठी राज्यभर जाहीर सभा घेतल्यात. या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद झाले असून, उद्या त्यांचा निकाल लागणार आहे. परंतु या निवडणुकीत कोण विजयाचा मुकुट घालणार आणि कोणाला पराभवाची चव चाखावी लागणार हे 23 नोव्हेंबरलाच समजणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या सहा जागांवर अटीतटीची लढत होत असून, त्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
1. वरळी (मुंबई): शिवसेना विरुद्ध शिवसेना, मनसेही रणांगणात
मुंबईच्या वरळी विधानसभेच्या जागेवर यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळतेय. या जागेवरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार आणि विद्यमान आमदार आदित्य ठाकरे पुन्हा रिंगणात आहेत, तर मिलिंद देवरा शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात आहेत. या जागेवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे निवडणूक लढवत आहेत.
आदित्य ठाकरे:2019 मध्ये वरळीतून दणदणीत विजय मिळवणाऱ्या आदित्य ठाकरेंनी कोविड 19 महामारीच्या काळात आपल्या कामातून प्रचंड प्रसिद्धी मिळवली.
मिलिंद देवरा: माजी खासदार आणि यूपीए 2 सरकारमधील मंत्री देवरा यांनी शहरी मध्यमवर्गीय मतदारांना आकर्षित करून आपला विजय सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत.
संदीप देशपांडे:मनसेचे उमेदवार देशपांडे स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहेत, विशेषत: पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माणाशी संबंधित मुद्दे त्यांनी उचललेत.
2. माहीम (मुंबई) : मनसे विरुद्ध ठाकरे गट आणि शिंदेंची शिवसेना रिंगणात
माहीम विधानसभेच्या जागेवर तिरंगी लढत होत आहे. शिवसेना (उद्धव गट) पक्षाकडून महेश बळीराम सावंत हे रिंगणात असून, मनसेकडून अमित राज ठाकरे हे निवडणूक लढवत आहेत. यासोबतच सदा सरवणकर हे शिवसेनेकडून (शिंदे गट) निवडणूक लढवत आहेत. सदा सरवणकर सध्या या जागेवरून आमदार आहेत.
3. बारामती : पवार विरुद्ध पवार सामना, पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला
बारामतीची जागा पवार घराण्याचा बालेकिल्ला मानली जाते, मात्र यावेळी पवार कुटुंबातच स्पर्धा आहे. या जागेवरून शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आता जनता काका की पुतण्याला निवडते हे उद्याच समजणार आहे.
अजित पवार :1991 पासून सलग सात वेळा या मतदारसंघातून आमदार राहिलेले अजित पवार बारामतीत विजयी होणार असल्याचे मानले जाते. 2019 मध्ये ते सर्वाधिक मतांनी विजयी झाले होते.
युगेंद्र पवार :शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारणात प्रवेश करणारा त्यांचा नातू युगेंद्र यांना तरुण मतदार आणि कौटुंबिक प्रभावाचा लाभ मिळू शकतो.