मुंबई - राज्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यांच्या पक्षांमध्ये फूट पाडून त्याच पक्षावर दावा केला असला तरी असली शिवसेना आणि असली राष्ट्रवादी काँग्रेस, यावरून आजही रणकंदन सुरू आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याच्या मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसलाय. तर अजित पवार यांच्या बंडखोरीचा सर्वात जास्त फटका पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना बसलाय. या कारणास्तव यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेल्या गद्दारांना गाडा, अशा स्पष्ट शब्दांत शरद पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनी मतदारांना आवाहन केलंय. बंडखोरांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ असून, त्याने पक्षालाही मजबुती येईल, असं शरद पवार म्हणालेत.
फायदा महाविकास आघाडीलाच : 15 व्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात एकूण 288 जागांसाठी 4136 उमेदवार रिंगणात असून, यामध्ये बंडखोरांचे प्रमाणही लक्षणीय आहे. राज्यात सर्वपक्षीय तब्बल 178 बंडखोर असून यापैकी 70 ते 80 बंडखोर मतदारसंघातील चित्र पालटू शकते, अशी शक्यता राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी व्यक्त केलीय. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत 45 अपक्ष आमदार निवडून आले होते आणि त्याचा सर्वात मोठा फटका हा काँग्रेस पक्षाला बसला होता. यंदाही राज्यात राजकीय समीकरण पूर्णता बदलली असून, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्येच अंतर्गत फूट पाडल्यामुळे राज्यातील राजकीय चित्र बदलले जाण्याची मोठी शक्यताही माईणकर यांनी बोलून दाखवलीय. यासोबतच बंडखोर अपक्ष आमदारांच्या विजयाने याचा मोठा फायदा महाविकास आघाडीलाच होईल, असेही ते म्हणालेत.
पक्षात महाभूकंप झाला... : एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार यांनी परस्पर आपापले पक्ष फोडल्यानंतर त्या पक्षाला सावरताना उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार यांना तारेवरची कसरत करावी लागली. एका झटक्यात पक्षातील 40 आमदार फुटतील याची कल्पनाही कोणी केली नव्हती. परंतु एक विशिष्ट षडयंत्र रचून हे सर्व केलं गेल्याचा आरोप उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार यांच्याकडून होत आहे. तरीही या कठीण परिस्थितीमध्ये न डगमगता उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार यांनी आपापले पक्ष सावरलंय. पक्षाचं नाव चिन्ह हातातून निसटून गेल्यानंतरही ते त्याच पक्षावर कायम राहिलेत. पक्षात महाभूकंप झाला असताना अशा परिस्थितीत पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना उद्धव ठाकरे त्याचबरोबर शरद पवार गटाने जनतेची मनं जिंकली, मतं जिंकली. आता विधानसभेला बंडखोर आमदारांची खरी कसोटी लागणार असल्याने या गद्दारांना गाडून टाका, असा थेट इशारा शरद पवार यांनी दिलाय. खरी शिवसेना आमचीच, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करीत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता जनताच खऱ्या खोट्याचा फैसला मतपेटीच्या माध्यमातून करणार आहे. याकरिताच जनतेला वारंवार मतदान करण्याचं आवाहन शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांच्याकडून केलं जातंय.
बंडखोर आमदारांची कसोटी :सिल्लोड मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचा पराभव करण्यासाठी चक्क भाजपा कार्यकर्त्यांना मदतीची साद घातलीय. गद्दारांना पाडण्यासाठीच ही निवडणूक असून, जनतेने यामध्ये पूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय. राष्ट्रवादी अजित पवार गटाने यंदा विधानसभा निवडणुकीत 59 उमेदवार उभे केले असून, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून 86 उमेदवारांना संधी देण्यात आलीत. एकनाथ शिंदे शिवसेना गटाकडून 81 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, उबाठा गटाकडून 95 उमेदवारांना संधी देण्यात आलीय. विशेष म्हणजे यापैकी अनेक लढती या थेट दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होत असल्याने यंदा बंडखोर आमदारांची कसोटी लागणार आहे.
हेही वाचा...
- महालक्ष्मी योजनेतून महिलांना देणार 3 हजार, एसटी प्रवासही करणार मोफत; राहुल गांधींनी दिलं आश्वासन
- राहुल गांधींनी दिली अचानक नांदेडच्या बसस्थानकात भेट, रस पीत नागरिकांशी साधला संवाद