मुंबई : भाजपाला जनतेने सत्ता दिली, मात्र त्यांनी काळा अध्याय लिहिला, अशी टीका राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलीय. काँग्रेसचे नेते अशोक गेहलोत यांनी राजीव गांधी भवनात आज पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. भाजपाने आमदारांची पळवापळवी केली, त्या माध्यमातून सरकार हटवले. देशातील स्वायत्त संस्था सरकारच्या दबावात काम करीत आहेत. असे प्रकार घडत राहिल्यावर देशातील लोकशाही कशी टिकणार, संविधानाला या घटनांमुळे धोका निर्माण झालाय, असंही गेहलोत यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेरा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि सचिन सावंत, चरणसिंह सप्रा उपस्थित होते. अशोक गेहलोत यांनी महाविकास आघाडीच्या पाच गॅरंटी आणि महाराष्ट्रनामा जनतेसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.
25 लाख विमा योजनेमुळे नागरिकांना सुरक्षा:राज्यातील जनता नक्कीच महाविकास आघाडीला सत्ता देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. राज्यातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबरला समाप्त होतेय. तर 23 नोव्हेंबरला निकाल लागेल. त्यामुळे वेळेत सत्ता स्थापन झाली नाही तर भाजपा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भीती गेहलोत यांनी व्यक्त केलीय. या सर्व बाबींमध्ये निवडणूक आयोगाला कोण शिकवतंय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आम्ही चिरंजीवी योजना राजस्थानमध्ये राबवली, त्याच प्रमाणे महाराष्ट्रात 25 लाख रुपयांचा कुटुंब विमा राबवणार, असंही गेहलोत यांनी स्पष्ट केलं. सर्वसामान्य नागरिकांसाठी सामाजिक सुरक्षा योजना राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. महाराष्ट्र आणि मुंबईतील जनता या निवडणुकीतून देशाला संदेश मिळेल. देशासाठी ही महत्त्वपूर्ण निवडणूक असून, लोकशाही, संविधान, धर्म निरपेक्षता वाचवण्याचे धेय्य आमच्यासमोर आहे. 25 लाख विमा योजनेमुळे नागरिकांना सुरक्षा मिळेल, असा दावा त्यांनी केलाय.
विरोधक काहीही बोलले तरी जनता ठरवेल:जातीनिहाय जनगणनेमुळे सामाजिक आर्थिक सर्व्हे होईल, सत्ताधाऱ्यांना त्याची दखल घेऊन धोरणे ठरवावी लागतील. त्यामुळे विरोधक काहीही बोलले तरी जनता ठरवेल, असे ते म्हणाले. बजेटमध्ये प्राधान्य कशाला देणार त्याप्रमाणे निधी उपलब्ध होईल, विरोधकांनी निधीची काळजी करू नये, आम्ही दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार, असे त्यांनी स्पष्ट केले. मविआचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेऊ, महायुतीची बटेंगे तो कटेंगे व एक है तो सेफ है ही जाहिरात देशाचे दुर्भाग्य आहे. त्यांनी समाजात फूट पाडली, असा आरोप गेहलोत यांनी केलाय. यापूर्वी काँग्रेसने कधीच ही भूमिका घेतली नाही. काँग्रेसने नेहमीच विरोधकांचा सन्मान केलाय, सध्या मात्र परिस्थिती वेगळी आहे, असे ते म्हणाले. महायुती सरकार किमान आरोग्य सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलंय. आरोग्य क्षेत्रातील 20 हजार पदे रिक्त ठेवलीत. राज्याचे आरोग्य क्षेत्रासाठीचे बजेट कमी करून अवघे 4.6 टक्के केलं, असे आरोप गेहलोत यांनी केलेत.
सामाजिक सलोखा कोणी बिघडवला? :वर्षा गायकवाड यांनीसुद्धा सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागलीय. विरोधकांनी जाती-जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केलाय. सामाजिक सलोखा कोणी बिघडवला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. अनसेफ तुम्ही केले आणि आता एक है सेफ म्हणताय, असा टोला त्यांनी लगावला. मुख्य निवडणूक आयोगाने पक्षपातीपणा करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विरोधकांची तपासणी करता मग सत्ताधाऱ्यांना वेगळी वागणूक का देता ही भूमिका चालणार नाही, असे त्या म्हणाल्या. धारावी भेटवस्तू वाटप नेमके कुणातर्फे झालंय, एकनाथ शिंदे यांच्यातर्फे की अदानी यांच्यातर्फे याची चौकशी होण्याची गरजही वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली.
हेही वाचा -
- मतांसाठी लाडक्या बहिणींना धमकी, राजकीय दबाव तंत्राचा वापर, संजय राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
- राज ठाकरेंकडं फडणवीसांची स्क्रिप्ट; ईडीची टांगती तलवार असल्यानं त्यांना बोलावं लागते, संजय राऊतांचा हल्लाबोल