मुंबई -देशात काँग्रेसमुक्त भारत करण्याचा नारा भाजपाने दिलाय. 2014 नंतर देशात भाजपाची सत्ता आलेली असून, सद्यस्थितीत देशातील अनेक राज्यांत भाजपाची सत्ता आहे. काँग्रेसनं देशावर अनेक वर्षं राज्य केलंय. भ्रष्टाचार, घोटाळ्यामुळं देशाची अधोगती झाली, त्यामुळे काँग्रेसमुक्त भारत केला पाहिजे, असा नारा भाजपाने दिलाय. मात्र अलीकडच्या काळात देशातील अनेक राज्यात भाजपाने काँग्रेसमुक्त भारत करता करता राज्यांतील प्रादेशिक पक्षमुक्त करण्याचा प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. देशातील पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस, उत्तर प्रदेशमधील समाजवादी पार्टी आणि दक्षिणेतील स्टॅलिन यांचे प्रादेशिक पक्ष सोडले तर देशभरात भाजपाने अनेक प्रादेशिक पक्षांचं खच्चीकरण केलंय किंवा त्यांना आपल्यासोबत घेऊन त्यांचे महत्त्व कमी केलंय.
भाजपा प्रादेशिक पक्षमुक्त भारत करतेय का?:दुसरीकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचे दोन गट पडल्यानंतर हे दोघे स्वतःचे प्रादेशिक पक्ष टिकवण्यासाठी संघर्ष करताहेत. प्रादेशिक पक्षातील विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावून त्यांना नामोहरम करायचं, जेरीस आणायचं किंवा विरोधकांना स्वतःकडे घ्यायचं हे भाजपाचे षड्यंत्र असल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रात ज्या शिवसेनेमुळं भाजपा मोठी झाली, रुजली आणि वाढली, त्याच शिवसेनेला फोडण्याचं काम भाजपाने अडीच वर्षांपूर्वी केलं. शिवसेनेचे दोन तुकडे पडल्यानंतर राष्ट्रवादीचीही दोन तुकडे पडले आहेत. त्यामुळं महाराष्ट्रात भाजपाला टक्कर देतील, असे सध्यातरी प्रादेशिक फक्त उरलेले नाहीत. देशपातळीवरही अशीच स्थिती आहे. भाजपा काँग्रेसमुक्त करता करता प्रादेशिक पक्षमुक्त भारत करीत आहे का? किंवा भाजपाकडून तसा प्रयत्न होतोय का? पाहू यात.
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीचे 2 गट :2019 साली शिवसेना आणि भाजपाने एकत्र निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती. भाजपाचे 105 आमदार येऊनही त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले होते. हा राग भाजपातील नेत्यांमध्ये होता. यादरम्यान, राज्यात ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स यांच्या धाडी, चौकशा यांचा ससेमिरा लावून विरोधकांना नामोहरम केल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेतील शिंदे या नाराज गटाला भाजपाने स्वतःकडे घेतले. शिंदेंच्या बंडास भाजपाची अदृश्य शक्ती, महाशक्ती यांचा पाठिंबा होता. तर सव्वाएक वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांना घेऊन महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात फूट पाडण्याचे काम भाजपाने केले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. तर याला तज्ज्ञ आणि जाणकार यांनीही दुजोरा दिलाय. त्यामुळं सध्या ठाकरे-पवार यांच्यासमोर आपला पक्ष टिकवून ठेवून आणि तो वाढवणे हे मोठं आव्हान असल्याचं बोललं जातंय.
शिंदे-पवारांसमोर देखील आव्हान? : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे. शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे आपला उरलेला-सुरलेला पक्ष राज्याच्या राजकारणात टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या धर्तीवर ते पक्षांची बांधणी करताना दिसताहेत. मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालांमुळे भाजपा राज्यातील प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करीत आहे का? या चर्चांना देखील उधाण आलंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससमोर राज्याच्या राजकारणात आपल्या पक्षाचे वेगळेपण आणि पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे आव्हान दोघांसमोरही आहे. या दोघांचीही आगामी काळात वाईट अवस्था भाजपा करेल, असं भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. त्यामुळं देशाप्रमाणे राज्यातही भाजपाला प्रादेशिक पक्ष नको आहे का? अशी चर्चा सुरू आहे.
भाजपाचा दृष्टीने प्रादेशिक पक्ष नगण्य :देशभरात अनेक राज्यातील उदाहरणं पाहिली तर जे जे प्रादेशिक पक्ष भाजपाला डोईजड झाले किंवा त्यांची ताकद वाढली, त्या त्या पक्षांना एक तर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून भीती दाखवली किंवा सत्तेचं गाजर दाखवून त्यांना जवळ करण्याची भाजपाची खेळी राहिलीय. त्यामुळं प्रादेशिक पक्ष हे भाजपाच्या दृष्टीने नगण्य ठरलेत. कारण भाजपाला जो जो विरोध करतोय किंवा डोईजड वाटतोय त्याला संपवण्याची ही भाजपाचे प्रवृत्ती आहे, असं "ईटीव्ही भारत"शी बोलताना राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलंय. दुसरीकडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हेदेखील म्हणाले आहेत की, देशात केवळ भाजपा एकच पक्ष राहिला पाहिजे आणि त्याच दृष्टीने ते आगेकूच करीत आहेत. अनेक राज्यात भाजपाने प्रादेशिक पक्षांच्या मदतीने तिथे आपली सत्ता स्थापन केलीय. मात्र प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा डाव भाजपाने बरोबर साधलाय. काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष किंवा विरोधकांकडे एवढी ताकद नाही की ते सध्या भाजपासोबत सामना करू शकतील. पण आगामी काळात उरलेल्या अनेक प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे काम भाजपा करताना दिसेल, अशी भीतीसुद्धा राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी व्यक्त केलीय.
विरोधकांना सत्तेच्या वाटा दिला :भाजपाला आपल्यापेक्षा ज्यांची ताकद जास्त वाटते किंवा आपल्याला जे विरोध करतात किंवा जे आपले विरोधक आहेत, अशांना भाजपाने एकतर सत्तेचा वापर करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला किंवा जे आपणाला विरोध करताहेत त्यांना सत्तेचा वाटा दिलाय आणि सत्तेत सहभागी करून घेतले. याची उदाहरणे म्हणजे दक्षिणेतील तेलुगू देशमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना थेट केंद्रातच सत्तेचा वाटा दिला, तर बिहारमधील जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार हे भाजपाला वरचढ ठरत असल्यामुळं त्यांना केंद्रात सत्तेत स्थान दिलंय. त्यामुळे भाजपाला आता देशात कोणी विरोधकच उरला नाही, असंही म्हटले तरी ते अतिशयोक्ती ठरू नये. कारण भाजपाने विरोधकांना बरोबर आपल्या सापळ्यात अडकवलं आहे आणि त्यांना देशात विरोधकच ठेवायचे नाहीत, अशीही त्यांची रणनीती असल्याचं राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
- निर्मला सीतारामण अन् विजय रुपाणी भाजपाचे पक्ष निरीक्षक; चार डिसेंबरला विधिमंडळ पक्षाची बैठक
- शपथविधीच्या सोहळ्याची तयारी कशी आहे? प्रथमच महायुतीच्या नेत्यांनी एकत्रितपणं केली पाहणी