मुंबई - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षांचा कार्यकाळ यापूर्वी संपला होता, परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर म्हणजे फेब्रुवारी 2025 अखेर भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाणार असून, यामध्ये भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंचं नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्यातील भाजपा संघटना यांच्यामधील समन्वयासाठी विनोद तावडेंची उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन महत्त्वाच्या राज्यांचे केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याने अध्यक्षपदाच्या शर्यतीत विनोद तावडेंचं नाव अग्रेसर असल्याचे संकेत भाजपाकडून मिळत आहेत.
फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत अध्यक्षाची निवड : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा कार्यकाळ 30 जून रोजी समाप्त झाला होता. परंतु त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली होती. आता दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. अध्यक्षपदासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे येत असताना राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि प्रत्येक राज्यातील भाजपा संघटना यांच्या समन्वयासाठी पक्षाकडून केंद्रीय निरीक्षकांच्या नावांची घोषणा बुधवारी करण्यात आलीय. महाराष्ट्र आणि गोव्याचे निरीक्षक म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंची उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आल्याने अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये विनोद तावडेंचं नाव अग्रेसर असल्याचे संकेतच जणू भाजपाकडून देण्यात आलेत.
दिल्लीमध्ये एक मोठी कार्यशाळा : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीपूर्वी देशभरातील भाजपा संघटनेत बूथ अध्यक्षांच्या निवडणुका झाल्यात. आता भाजपा मंडल अध्यक्षांची निवडणूक ही 15 डिसेंबरपर्यंत आणि जिल्हाध्यक्षांची निवडणूक 30 डिसेंबरपर्यंत होणार आहे. या निवडणुकांनंतर प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी दिल्लीमध्ये एक मोठी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. जानेवारी 2025 पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुका संपल्यावर म्हणजे फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत भाजपाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याची शक्यता आहे.
अडकले पण डगमगले नाहीत : महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी पार पडल्यात. परंतु त्याच्या एक दिवस अगोदर विरारमधील विवांता हॉटेलमध्ये पैसे वाटण्याच्या आरोपामुळे विनोद तावडेंचं नाव चर्चेत आलं. विनोद तावडे यांच्यावर विरोधकांकडून पैसे वाटण्याचे अनेक आरोप केले गेले. परंतु त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला स्वस्तातील नौटंकी असं म्हटलंय. विनोद तावडे यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी विनोद तावडे यांच्यावरील आरोप फेटाळून लावलेत. विनोद तावडे यांनी शरद पवार एनसीपी गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना मानहानीच्या नोटिसा पाठवल्यात. परंतु या संपूर्ण प्रकरणाचा फायदा भाजपाला झाल्याचं निवडणूक निकालात दिसून आलंय. मागील 36 वर्षांपासून वसई- विरारमध्ये असलेली हितेंद्र ठाकूर यांची सत्ता नेस्तनाबूत करण्यात विनोद तावडेंना यश आलंय.