मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आलीय. निवडणुकीच्या काळात पैशांचे मोठ्या प्रमाणात वाटप होत असते. मतदारांना आमिष दाखवण्यासाठी पैसे, दारू, सोने, चांदी किंवा अन्य मौल्यवान वस्तूंचे वाटप केले जाते. खरं तर हे रोखण्यासाठी आणि याला आळा घालण्यासाठी पोलीस तसेच भरारी पथक यांची करडी नजर यावर असते. राज्यात जेव्हापासून आचारसंहिता लागू झालीय, तेव्हापासून कोट्यवधी रुपये आणि मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. विशेष म्हणजे पैसे सापडल्यानंतर एरवी हे पैसे आपले आहेत, असे सांगणारे नेते किंवा अन्य मंडळी, आता पोलिसांनी पैसे पकडल्यानंतर हे पैसे आपले नसल्याचं ही नेते मंडळी सांगत आहेत. तसेच हे पैसे कुणाचे आहेत? हे सांगण्यासाठी कोणीही समोर येत नाही. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केले जातंय. राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, अहिल्यानगर आदी ठिकाणांहून पोलिसांनी कोट्यवधी रुपये जप्त केल्याची घटना ताजी असताना शुक्रवारी मुंबईतील काळबादेवी परिसरात मुंबई पोलिसांनी 2 कोटींहून अधिक रोकड जप्त केली आहे. विशेष म्हणजे यात 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या हाती पैशाचं मोठं घबाड लागल्यानंतर हे पैसे कुणाचे आहेत? पैसे हे कुठे नेले जात होते? किंवा पैसे कशासाठी नेले जात होते? याचे उत्तर सापडत नाहीये. या सर्वाची पोलीस सखोल चौकशी करताहेत. मात्र पैसे कुणाचे आहेत? आणि कुठून आले? हे सांगण्यास मात्र पुढे कोणीही धजावत नाही. राज्यात आचारसंहितेच्या काळात कुठे कुठे पोलिसांनी पैसे जप्त केले आहेत. ते पाहू यात...
काळबादेवीत 2 कोटी जप्त, 12 जण ताब्यात:राज्यात 15 ऑक्टोबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली, तेव्हापासून राज्यातील विविध भागात म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर आदी ठिकाणी पोलिसांनी पैसे जप्त केलेत. यानंतर शुक्रवारी मुंबईतील काळबादेवी परिसरात दोन कोटींहून अधिक रोकड पोलिसांनी जप्त केलीय. यात 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढील तपास पोलीस करताहेत. दरम्यान, निवडणुकीला दोन आठवडे बाकी असताना हे पैसे निवडणुकीच्या वापरासाठी किंवा मतदारासाठीच नेले जात असल्याचा संशयदेखील व्यक्त करण्यात येतोय. काही दिवसांपूर्वी मुंबईत एका गाडीत मुंबई पोलिसांनी 30 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. यानंतर शुक्रवारी 2 कोटी होऊन अधिक रुपयांची रोकड जप्त केल्यामुळं मुंबई पोलीस अधिक सतर्क आणि सावधान झाले असून, ज्यांच्यावर संशय येतोय, त्यांची पोलीस कसून चौकशी करताहेत. तर काही दिवसांपूर्वी मुंबईतील भूलेश्वर या भागात पोलिसांनी 1 कोटी 32 लाखांची रोकड जप्त केली होती. ही रोकड घेऊन जाणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हे पैसे कुठून आणले होते? कुठे घेऊन जात होते? याबाबत पोलीस पाच जणांची चौकशी करताहेत.
नालासोपाऱ्यात ATM वाहनामधून साडेतीन कोटी जप्त : गुरुवारी नालासोपाऱ्यात एका एटीएम वाहनामध्ये साडेतीन कोटी रुपयांची रोकड एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या सीएमएस या कंपनीच्या वाहनामध्ये सापडली. दरम्यान, रकमेच्या कागदावरील पैशांची नोंद आणि सापडलेले पैसे यात मोठी तफावत असल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातंय . गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाने ही रोकड जप्त केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिलीय. या घटनेनंतर बविआचे नेते आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले होते. एटीएम मशीनमध्ये पैसे भरायला जाणाऱ्या सीएमएस या कंपनीच्या वाहनामध्ये साडेतीन कोटी रुपये सापडल्यानंतर हे पैसे आपले आहेत, असे म्हणण्यास पुढे कोणीही येत नाहीये. त्यामुळं याची पोलिसांनी सखोल चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बविआचे नेते उमेश नाईक यांनी केलीय.
आमदार शहाजी बापूंकडे अंगुलीनिर्देश : काही दिवसांपूर्वी पुण्यात एका गाडीत 5 कोटी रुपयांची रोकड सापडली होती. या गाडीचा नंबर शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या गाडीचा होता. खेड-शिवापूर टोलनाक्यावर 5 कोटी रुपये सापडले होते. या गाडीत 15 कोटी रुपये होते, पण केवळ 5 कोटी रुपये पोलिसांच्या हाती लागले. बाकीचे पैसे हे आमदाराच्या घरी पोहोचवले, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय. दुसरीकडे हे आपले पैसे नसल्याचा दावा आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलाय. दरम्यान, पोलिसांनी याची सखोल चौकशी केली पाहिजे. तपास यंत्रणा फक्त विरोधकांसाठीच वापरली जाते का? त्यांची चौकशी कुठे होते? या पैशांची चौकशी करून जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली होती. मात्र 5 कोटी रुपयांची सापडलेली ती रोकड शिंदे गटाच्या आमदाराचीच होती. मात्र त्यांनी हे पैसे आपले नसल्याचा दावा केलाय. तसंच ते खोटं बोलताहेत. हे पैसे निवडणुकीच्या कामाकरिता आणि मतदारांना देण्यासाठीच वापरण्यात येणार होते, असा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळं शंकेची पाल आणि अंगुलीनिर्देश हे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या दिशेकडेच जाताहेत.