महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अनिल देशमुख नौटंकी करताहेत, पण भाजपा आमदाराच्या बहिणीवरील हल्ला भ्याडच; चित्रा वाघ कडाडल्या

आज अमरावतीत अर्चना रोठे यांना भेटण्यासाठी चित्रा वाघ खासगी रुग्णालयात आल्या असता त्यांनी अनिल देशमुख आणि अर्चना रोठेंवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय.

BJP leader Chitra Wagh
भाजपा नेत्या चित्रा वाघ (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

अमरावती-माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आपल्यावर हल्ला झाल्याची नौटंकी करीत आहेत, असे प्रकार त्यांनी यापूर्वीदेखील अनेकदा केलेत, असं म्हणत चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. धामणगाव रेल्वे मतदारसंघात मात्र भाजपाचे उमेदवार आणि आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे यांच्यावर मात्र जो हल्ला झाला ते भ्याड कृत्य आहे, असं भाजपाचे नेते आणि विधान परिषद सदस्य चित्रा वाघ यांनी म्हटलंय. आज अमरावतीत अर्चना रोठे यांना भेटण्यासाठी त्या खासगी रुग्णालयात आल्या असता त्यांनी अनिल देशमुख आणि अर्चना रोठे यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिलीय.

रोठेंवरील हल्ल्याची बातमी जगतापांना कशी कळली? - रिंग्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात असणाऱ्या अर्चना रोठे यांची चित्रा वाघ यांनी भेट घेतलीय. नेमकी काय घटना घडली, या संदर्भात त्यांनी जाणून घेतलंय. यावेळी चित्रा वाघ यांच्यासोबत भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण पोटे आणि पक्षाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी सोबत होते. भाजपाच्या अनेक महिला पदाधिकारी यावेळी अतिदक्षता विभागात शिरल्यानं काहीसा गोंधळ उडाला. अर्चना रोठे यांच्यावर हल्ला झाला ही बातमी भाजपाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा नेत्याला कळण्याआधी धामणगाव रेल्वे मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांना कशी काय कळली? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय. अर्चना रोठे यांच्यावर हल्ला झाल्याचं सर्वात आधी काँग्रेसच्या उमेदवारानं फेसबुक लाईव्ह करून सांगितलंय. विशेष म्हणजे काही वेळातच त्यांनी फेसबुकवरील आपली पोस्ट डिलीट केली, असंदेखील चित्रा वाघ म्हणाल्यात.

अनिल देशमुख यांची स्टंटबाजी-अनिल देशमुख यांच्या कारच्या बुलेटवर भला मोठा दगड पडतो ही आश्चर्याची बाब आहे. अनिल देशमुख यांच्यावर जो काही हल्ला झाला तो प्रकार अनिल देशमुखांची स्टंटबाजी आहे. याउलट प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे या सातेफळ फाट्यालगत अंधारात वॉशरूमसाठी उतरल्या असताना त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी वार केला. त्यांच्या गळ्यावर चाकू हल्ला होत असताना त्यांनी तो हाताने अडवला. या घटनेत अर्चना रोठे या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यांच्यासोबत कारमध्ये दोन कार्यकर्ते होते, असंदेखील चित्रा वाघ म्हणाल्या.

सुप्रिया सुळे अन् यशोमती ठाकूर गप्प-महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने महिलांचा अपमान केला जातोय. इकडे अमरावतीत तर एका आमदाराच्या बहिणीवर गंभीर स्वरूपाचा हल्ला झालाय. काल-परवा नवनीत राणा यांच्यावर खुर्च्यांनी हल्ला करण्यात आलाय. असं असताना सुप्रिया सुळे या गप्प आहेत, इकडे त्यांच्या दुसऱ्या भगिनी यशोमती ठाकूर यादेखील काहीही बोलायला तयार नाहीत, याबाबत चित्रा वाघ यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

हेही वाचा -

  1. अनिल देशमुख यांच्या वाहनावर 'इतक्या' जणांनी केलीदगडफेक; नारे लावत गेले निघून, तक्रारीत नमूद केला 'हा' घटनाक्रम
  2. भाजपा उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर हल्ला; धामणगाव मतदारसंघात खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details