नांदेड - विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी जाहीर होणार असला तरी त्यापूर्वीच महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहावयास मिळतंय. नाना पटोले यांनीदेखील मुख्यमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली होती. यावरून आता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नाना पटोलेंना टोला लगावलाय. महाविकास आघाडीने नाना पटोलेंना मुख्यमंत्री करावे, ही माझीसुद्धा इच्छा आहे, पण शेवटी त्यांचं स्वप्न स्वप्नच राहणार आहे, असं म्हणत अशोक चव्हाणांनी उपरोधिक टीका केलीय. राज्यात महायुतीचं सरकार येणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
महायुतीचे सरकार येणार:महायुतीच सरकार स्थापन करणार हे स्पष्टपणे दिसत आहे. एक्झिट पोल नेहमीच 100 टक्के बरोबर असतात, असं माझं कधीच म्हणणं नाही. परंतु ते परिस्थितीबद्दल इशारा देतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे की, महायुती बहुमतानं सरकार स्थापन करेल,” अशी प्रतिक्रिया भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी एक्झिट पोलवर दिलीय. आमच्या लोकांनी भरपूर मेहनत घेतलीय, त्यामुळेच महायुतीला नक्कीच यश येईल आणि महायुतीचे सरकार स्थापन होईल, अशी भावनाही अशोक चव्हाणांनी बोलून दाखवलीय.
नऊ विधानसभा क्षेत्रात महिलांचा टक्का मोठा : नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा क्षेत्रात महिलांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढलाय. राज्य सरकारने चालवलेल्या लाडकी बहीण योजना आणि एसटी प्रवासात महिलांना सूट दिल्याने महिलावर्गानं मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून मतदान केलंय, त्यामुळेच महिलांची मतदानात टक्केवारी वाढल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय, असंही अशोक चव्हाण म्हणालेत.
मुंगेरीलाल के हसीन सपने कभी सच नही होते :काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे श्रीक्षेत्र रेणुका देवी माहूर गडावर दर्शनासाठी आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीचे सरकार येणार असून, काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल. तसेच काँग्रेसला 75 हून अधिक जागा मिळतील, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याच विधानावरून अशोक चव्हाणांनी नाना पटोलेंचा चांगलाच समाचार घेतलाय. "मुंगेरीलाल के हसीन सपने कभी सच नही होते" अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी त्यांची खिल्ली उडवलीय. तसेच राज्यात पुन्हा सत्तेवर महायुतीचे सरकारी येणार आहे, असंही भाजपा नेते अशोक चव्हाण यांनी ठामपणे सांगितलंय.
हेही वाचा-
- अजित पवारांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पूर्ण होणार? पुण्यात निकालाआधीच लागले शुभेच्छांचे बॅनर
- महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक, मुख्यमंत्री पदाबाबत बाळासाहेब थोरात म्हणाले..