मुंबई :मुंबईतील माहीम मतदारसंघ हा सध्या चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. मागील काही दिवसांपासून शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवार सदा सरवणकर यांनी इथून उमेदवारी मागे घ्यावी, असा त्यांच्यावर दबाव होता. खुद्द महायुतीतील अनेक नेत्यांनी सदा सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असं म्हटलं होतं. भाजपाचे आशिष शेलार यांनी आमचा सदा सरवणकरांना विरोध नाही. मात्र मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे जर पहिल्यांदाच निवडणूक लढवत असतील, तर महायुतीचा धर्म म्हणून आपण त्यांना निवडून का आणू नये? असं शेलार यांनी म्हटलं होतं. सदा सरवणकर यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या भेटीस गेले होते, अशा अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर अखेर सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. मागील अनेक दिवसांपासून कोणकोणत्या घटना घडल्या आणि आपण निवडणुकीला कसं सामोरे जाणार आहोत. विशेष म्हणजे स्वतः सदा सरवणकर यांनी "ईटीव्ही भारत"ला एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत सविस्तर माहिती दिलीय.
...अन्यथा तडजोड झाली असती :सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मी आणि माझा मुलगा समाधान दोघेही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेलो होतो. त्यांच्यासोबत बैठक झाली. बैठकीत निवडणूक लढवायची की अर्ज मागे घ्यायचे याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुम्ही राज ठाकरेंना जाऊन भेटा, असे सांगितले. यानंतर राज ठाकरेंना भेटण्यास मी, माझा मुलगा आणि चार पदाधिकाऱ्यांना पाठवले. मात्र राज ठाकरेंनी आमची भेट घेतली नाही. "तुम्हाला जर निवडणूक लढवायची आहे तर लढवा, मला तुमच्याशी बोलायचं नाही," असं राजसाहेब बोलले. त्यामुळं आम्हाला खूप वाईट वाटलं. आमचा अपमान झाला आणि कार्यकर्ते नाराज झाले. जर राज साहेबांनी भेट घेतली असती आणि अर्ज मागे घ्या, असं म्हटलं असतं तर नक्कीच मी अर्ज मागे घेतला असता किंवा तसा काहीतरी विचार केला असता. मात्र राज ठाकरेंनी भेट नाकारल्यामुळं मी निवडणूक लढल्यावर ठाम राहिलो. कार्यकर्तेही म्हणाले की, निवडणूक लढवली पाहिजे. शेवटी कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन मी आता निवडणुकीच्या रिंगणात आहे. आता 100 टक्के योगदान देऊन निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं शिवसेना (शिंदे गटाचे) उमेदवार सदा सरवणकर यांनी "ईटीव्ही भारत"ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.