मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेनं 5 आणि 6 डिसेंबरला परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल विभागादरम्यान 12 अधिक लोकलच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष लोकल सर्व स्थानकावर थांबतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी दिली.
तिकीट काढून प्रवास करा : "देशभरातून येणारे अनुयायी लक्षात घेता मध्य रेल्वेनं विविध सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधांमुळं प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि त्यांना गर्दीचा सामना देखील करावा लागणार नाही. तसंच सर्व प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा," असं आवाहन देखील डॉ. स्वप्निल नीला यांनी केलंय.
प्रतिक्रिया देताना डॉ. स्वप्निल नीला (ETV Bharat Reporter) पोलीस कर्मचारी तैनात : डॉ. स्वप्निल नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, "प्रवाशांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दादर येथे 223, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 166, लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 105, ठाणे येथे 103 आणि कल्याण येथे 78 असे एकूण 675 तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सोबतच अतिरिक्त RPF जवान देखील तैनात करण्यात आले आहेत. दादर येथे 120, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 40 आणि कल्याण येथे 30 कर्मचारी नियमित तैनात करण्यात आले आहेत. अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून दादर येथे 250 हून अधिक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 80 हून अधिक लोहमार्ग पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत."
मार्गदर्शनासाठी 214 बॅनर : "दादर येथे सेंट्रल आणि वेस्टर्न लाईन आणि सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म नंबर 7 आणि प्लॅटफॉर्म नंबर 8 दरम्यान उपलब्ध जागेजवळ होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. दादर येथील गर्दी सुरळीत चालावी यासाठी मध्य पूल आणि पालिका पुलावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. दादर स्थानकाच्या प्रमुख ठिकाणी प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी 214 बॅनर लावण्यात आले आहेत. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकावरील चौकशी कार्यालयाजवळ ट्रेन क्रमांक आणि विशेष गाड्यांची वेळ असलेले बॅनर प्रदर्शित केले जातील. मध्यवर्ती उद्घोषणा प्रणाली आणि स्थानक उद्घोषणाद्वारे विशेष गाड्याबाबत वारंवार घोषणा केल्या जातील," अशी माहिती डॉ. स्वप्निल नीला यांनी दिली.
लोकलचे वेळापत्रक : मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, "पाच आणि सहा तारखेला चालले जाणाऱ्या विशेष गाड्यामध्ये मुख्य मर्गिकेवर परळ-ठाणे स्पेशल लोकल दुपारी 1.15 वाजता परळहून सुटेल आणि ठाण्यात 1.55 वाजता पोहोचेल. परळ-कल्याण विशेष लोकल दुपारी 2.25 वाजता परळहून सुटून दुपारी 3.40 वाजता कल्याणला पोहोचेल. परळ-कुर्ला विशेष लोकल दुपारी 3.05 वाजता परळहून सुटेल आणि कुर्ला येथे 3.20 वाजता पोहोचेल."
कुर्ला-पनवेल विशेष लोकल : हार्बर मार्गावरील वाशी-कुर्ला विशेष लोकल ही वाशी येथून दुपारी 1.30 वाजता सुटून पहाटे 2.10 वाजता कुर्ला येथे पोहोचेल. पनवेल-कुर्ला ही गाडी पनवेलहून दुपारी 1.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 2.45 वाजता पोहोचेल. वाशी-कुर्ला लोकल वाशीहून दुपारी 3.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 3.40 वाजता पोहोचेल. कुर्ला-वाशी लोकल विशेष गाडी कुर्ला येथून दुपारी 2.30 वाजता सुटेल आणि वाशीला दुपारी 3.00 वाजता पोहोचेल. कुर्ला-पनवेल विशेष लोकल कुर्ला येथून दुपारी 3.30 वाजता सुटेल आणि पनवेलला पहाटे 5.30 वाजता पोहोचेल. कुर्ला-वाशी विशेष लोकल कुर्ल्याहून दुपारी ४ वाजता सुटून वाशीला 4.35 वाजता पोहोचेल.
हेही वाचा -
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा निर्णय, प्लॅटफॉर्म तिकीट विक्री 'या' तारखेपर्यंत ठेवणार बंद
- महापरिनिर्वाण दिनानिमित्त पाहावेत असे आंबेडकरी विचारांचे चित्रपट
- आदर्श विद्यार्थी ते घटनातज्ज्ञ, पत्रकारिता ते अर्थकारण क्षेत्रात चौफेर संचार! डॉ. बाबासाहेबांचे 'असे' होते अष्टपैलू व्यक्तिमत्व