मुंबई : उत्तर प्रदेशमधील महाकुंभ मेळाव्याला (Mahakumbh 2025) जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाकुंभ मेळाव्याला जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेतर्फे आता विशेष गाड्या (special trains for Mahakumbh 2025) चालवल्या जाणार आहेत. भाविकांना विनाव्यत्यय आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागातून या विशेष रेल्वे चालवण्यात येणार आहेत.
'या' मार्गावर चालवल्या जाणार विशेष गाड्या : सीएसएमटी ते मऊ आणि परत सीएसएमटी या मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या १४ फेऱ्या चालवल्या जातील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते वाराणसी आणि परत लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या ४ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. पुणे ते मऊ आणि परत पुणे या मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या १२ फेऱ्या चालवल्या जातील. तर नागपूर ते दानापूर आणि परत नागपूर या मार्गावर विशेष रेल्वेगाड्यांच्या १२ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. इतर विभागांकडून चालवल्या जाणाऱ्या काही विशेष गाड्यादेखील मध्य रेल्वेच्या स्थानकांवरुन जाणार आहेत. त्यामुळं या गाड्यांचा लाभदेखील प्रवाशांना होईल.
- मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण
- नागपूर-नागपूर, सेवाग्राम, बल्लारशाह, चंद्रपूर, बैतुल, पांढुर्णा
- पुणे- पुणे, मिरज, अहमदनगर, दौंड
- भुसावळ- भुसावळ, नाशिक रोड, मनमाड, खंडवा
- सोलापूर विभागातील सोलापूर येथून महाकुंभसाठी या विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.