कोल्हापूर : प्रेमाला ना जात असते ना धर्म, मानवी मनाच्या संवेदना एकमेकाप्रती व्यक्त झाल्या की, प्रेमाचा अंकुर बहरत जातो. एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटतो. यातूनच मानवी हृदयाचा विकास साधला जातो आणि प्रेमाची कबुली दिली जाते. प्राथमिक शिक्षणापासून एकाच शाळेत असलेले नंतर शाहिरी संगीताचे धडे गिरवताना एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालेले कोल्हापूरचे शाहीर विशारद आझाद नायकवडी आणि शाहीर अलंकार मनीषा यांच्या प्रेमाचीही गोष्ट अशीच आहे. महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण घेताना दोघांनाही शाहीरी संगीतानं एकत्र जोडलं. डॉ. मनीषा यांनी लग्नानंतर शाहीर आझाद यांची विशारद पदवी पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला, "यामुळं मला आधुनिक सावित्री मिळाली" अशा भावना व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं आझाद यांनी व्यक्त केली. तर, माझं पहिलं व्हॅलेंटाईन शाहीर आझादचं असल्याची कबुली शाहीर अलंकार डॉ. मनीषा नायकवडी यांनी दिली. पाहुयात शाहिरीला अखंड वाहिलेल्या आझाद आणि मनीषा यांच्या प्रेमाची गोष्ट.
मैत्रीच रुपांतर प्रेमात कधी झालं समजलं नाही : करवीर संस्थान अधिपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात कलेला राजाश्रय दिला. अनेक कलाकार या कोल्हापूर नगरीतून नावारुपास आले. 'शाहीर महाराष्ट्राचा प्राण' अशा पद्धतीनं या शाहिरांना मानाचं पान राजदरबारात असायचं. कोल्हापूरच्या राजघराण्यात १९९२ पासून दरबारी शाहीर म्हणून सेवा करत असलेले आझाद नायकवडी यांना वयाच्या चौथ्या वर्षापासूनच वडील शाहीर पापालाल नायकवडी यांच्याकडून शाहिरीचे धडे मिळाले. शाहिरी आणि संगीत विषयात आवड असल्यानं याच विषयात पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवत आझाद नायकवडी यांनी शाहीर आत्माराम पाटील यांच्या रचनांचा शाहिरी अभ्यास या विषयात पीएचडी संपादन केली. दरम्यानच्या काळात मनीषा यांनीही संगीत विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. बालपणी वर्गशिक्षिकेची मुलगी असलेल्या मनीषा आणि आझाद यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात कधी झालं दोघांनाही समजलं नाही. मात्र, दोघांना एकत्र बांधणारा संगीत हा धागा मनमुराद जपण्यात दोघांनाही यश मिळालं आणि २००५ यावर्षी आंतरधर्मीय विवाह करून पुरोगामी कोल्हापुरातून राजर्षी शाहूंचा विचार जपण्याचं काम शाहीर आणि संगीत क्षेत्राला वाहून घेतलेल्या मनीषा आणि आझाद नायकवाडी यांनी केलं. तत्कालीन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन या आंतरधर्मीय विवाहाला समाज मान्यता मिळवून दिली.
शाहीर आझाद यांच्यासाठी मनीषा बनल्या आधुनिक सावित्री : संगीत विषयात संशोधन करून आझाद नायकवडी यांनी डॉक्टरेट मिळवली. याच विषयातील शाहीर विशारद पदवी संपादन करण्यासाठी पत्नी मनीषा आपल्या मागं खंबीर उभ्या राहिल्या. त्यांनीच पुढाकार घेत डॉक्टर आझाद यांच्या विशारद पदवीसाठी अभ्यासापासून ते संशोधन पेपर तयार करण्यात सिंहाचा वाटा उचलला. यामुळं नायकवडी शाहीर विशारद आझाद नायकवडी म्हणून प्रसिद्ध झाले. याचं सगळं श्रेय डॉ. आझाद आपली पत्नी शाहीर अलंकार डॉ. मनीषा नायकवडी यांना देतात.
शाहीर दांम्पत्याने अवघा महाराष्ट्र पिंजून काढला :डफावर थाप देत प्रबोधनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांचा विचार महाराष्ट्रासह देशात पोहोचावा यासाठी शाहिरीच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षात सुमारे ३ हजाराहून अधिक शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम करून प्रबोधन करण्याचं काम शाहीर विशारद डॉ. आजाद नायकवडी आणि त्यांच्या पत्नी डॉ. मनीषा नायकवडी यांनी केलं आहे. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासमोर दोनवेळा आणि प्रणव मुखर्जी, रामनाथ कोविंद यांच्यासमोर शाहिरी कला सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. पुण्यातील राजर्षी शाहू महाराज पुतळा अनावरण कार्यक्रम, रायगडावरील शिवराज्याभिषेक दिन सोहळा, दिल्लीतील शिवजयंती निमित्तानं डॉ. आझाद नायकवडी यांना शाहिरी कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. राष्ट्रपतींसमोर लोककलेचं सादरीकरण करणारे महाराष्ट्रातील ते एकमेव शाहीर आहेत.