मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटता सुटत नाही, असं चित्र सध्या दिसत आहे. दिल्लीतील केंद्राचं नेतृत्व असो किंवा राज्यातील भाजपा पक्ष श्रेष्ठींचा अहवाल. याबाबत अनेक बैठका होऊन सुद्धा अद्याप महायुतीच्या जागा वाटपात शिंदे, पवार गटाला किती जागा द्यायच्या ? याबाबत संभ्रम कायम आहे. त्यातच आता जागा वाटपाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी आक्षेप घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.
जागा वाटपाबाबत 2 ते 3 दिवसात अंतिम निर्णय :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मागच्या आठवड्यात महाराष्ट्र, मुंबई दौऱ्यावर असताना महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटेल, अशी शक्यता वर्तवली गेली होती. परंतु इतके दिवस उलटून सुद्धा अद्याप महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम आहे. यातून तोडगा निघत असताना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं त्यामध्ये उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर या निवडणुका लढवल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे त्याचबरोबर अजित पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदी यांच्या नावावर निवडून येणार असतील, तर त्यांना विनाकारण जास्त जागा का द्यायच्या? असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित केल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे. परंतु या मुद्द्यावर उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. कर्नाटक दौऱ्यावर असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, "याबाबत येत्या दोन ते तीन दिवसात अंतिम निर्णय घेतला जाईल." परंतु अंतर्गत बाबीवर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
शिवसेनेनं 5 ते 6 खासदारांचे चेहरे बदलावेत :राज्यात महायुतीच्या जागा वाटपात भाजपा 32 ते 35 जागांवर निवडणूक लढवणार असून उर्वरित जागा शिंदे, पवार गटाला दिल्या जाणार आहेत. त्यातच एकनाथ शिंदे यांच्या गटाला 10 ते 12 आणि अजित पवार गटाला जेमतेम 4 ते 5 जागा देण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अशा परिस्थितीत सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटानं जास्त जागांची मागणी केल्यास त्यांना जास्तीच्या जागा देण्यात येऊ नयेत. असा पवित्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठांनी घेतल्याचा दावा या सूत्रांनी केला आहे. जागा वाटपाबाबत अनेकदा महायुतीच्या बैठका झाल्या. यामध्ये प्रत्येक पक्षानं आपल्या उमेदवाराची जिंकण्याची क्षमता, मतदार संघावर असलेला प्रभाव, विद्यमान खासदारानं मतदार संघात केलेली कामे आणि त्यांची लोकप्रियता. या सर्व बाबींचं सर्वेक्षण केल्यानंतर उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. यामध्ये अनेक विद्यमान खासदारांना डच्चूसुद्धा दिला जाऊ शकतो. त्याच प्रकारे एकनाथ शिंदे यांनी त्यांचे 5 ते 6 विद्यमान खासदारांचे चेहरे बदलावेत, असा पवित्राही भाजपाच्या सर्वेक्षणात घेतला गेला आहे. अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाचं टेन्शन मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे.