मुंबई South Mumbai Lok Sabha Constituency : देशात आणि महाराष्ट्रात शुक्रवारी (25 एप्रिल) लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार असताना महायुतीत अद्यापही काही जागांवर तिढा कायम आहे. त्यातच मुंबईतील प्रतिष्ठित अशा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघावर आता एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार देण्याचं जवळपास निश्चित झालंय. मात्र, यामुळं आता मागील महिना, दोन महिन्यांपासून या मतदारसंघासाठी बांधणी करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी बघायला मिळत आहे.
यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना शिवसेना उबाठा गटाकडून उमेदवारी देण्यात आलीय. हा मतदारसंघ महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडं असल्यानं एकनाथ शिंदे या मतदारसंघात उमेदवार देण्यास ठाम आहेत. राज ठाकरेंची मनसे महायुतीत सामील झाल्यास हा मतदारसंघ राज ठाकरे यांच्यासाठी सोडण्याचं महायुतीकडून ठरवण्यात आलं होतं. परंतु, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या कारणानं या मतदारसंघातून एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवार दिला जाण्याची शक्यता वर्तवली गेली. त्यानंतर आता भायखळा विधानसभा मतदार संघाच्या शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्याचं जवळपास निश्चित झालंय. त्यामुळं या मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक असलेले उमेदवार नाराज झाले असून कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नाराजीचं वातावरण आहे.
मतदारसंघात भाजपाकडून मोर्चे बांधणी : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपा नेते, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याचप्रमाणे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा हे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर या दोघांनाही या मतदारसंघातून तयारी करण्यास सांगण्यात आलं. त्या पद्धतीनं या दोन्ही नेत्यांनी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात बांधणी करायला सुरुवात केली. याकरिता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली तर राहुल नार्वेकर यांनी भायखळ्यात अरुण गवळी यांची मुलगी गीता गवळीची भेट घेत आपण अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेचे एक सदस्य असल्याचंही जाहीर केलं. परंतु या मतदारसंघावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला असल्यानं भाजपात नाराजी पसरली आहे. महाराष्ट्र भाजपा प्रभारी दिनेश शर्मा यांनी यामध्ये लक्ष घालावं यासाठी भाजपा कार्यकर्ते प्रयत्नात आहेत. तसंच यामिनी जाधव यांना उमेदवारी दिल्यास त्या या मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता फारच कमी असल्याचंही भाजपा कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येतंय.