पिंपरी चिंचवड 50 Lakh Cash Seized : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील उर्से टोल नाक्याजवळ नाकाबंदी दरम्यान पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना एका स्कॉर्पिओ गाडीत 50 लाखांची रोकड सापडल्यानं खळबळ उडालीय. देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरु असतांना ही रोकड सापडल्यानं सर्वत्र चर्चा होत आहे.
गाडीत आढळली 50 लाखांची रोकड : पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत 9 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. नाकाबंदी दरम्यान मंगळवारी रात्रीच्या सुमारास उर्से टोल नाक्यावर शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी वाहनांची तपासणी करत होते. तपासणी दरम्यान पोलिसांना एका स्कॉर्पिओतील प्रवाशांवर संशय आला. या गाडीची तपासणी केल्यावर पोलिसांना स्कॉर्पियो गाडीत तब्बल 50 लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. पोलिसांनी लागलीच वाहनचालकाला ताब्यात घेत विचारपूस केली. मात्र चौकशीत संबंधित व्यक्ती उडवाउडवीची उत्तरे देत होता. 50 लाख रोकड किंमतीचा योग्य खुलासा संबंधित व्यक्तीला करता आला नाही. त्यामुळं ही रक्कम पोलिसांनी जप्त केलीय.