नागपूर Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी पोलिंग पार्टी रवाना झालेल्या आहेत. पहिल्या टप्प्यात विदर्भातील एकूण पाच मतदारसंघाचा समावेश आहे. नागपूर आणि रामटेक मतदारसंघात एकूण 42 लाख 72 हजार 366 मतदार असून त्याकरिता रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्र निर्माण करण्यात आलीत. सकाळपासून पोलिंग पार्टीला मतदानाचं साहित्य वाटप सुरू झालं असून पोलिंग पार्टी आता रवाना झालेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून नागपूर आणि रामटेक मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष दिलं जातंय.
जिल्ह्यात 124 संवेदनशील मतदान केंद्रे : नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान होत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे 54 टक्के मतदान झालं होतं. यंदा ही टक्केवारी 75 टक्क्यांवर घेऊन जाण्याचं उद्धिष्ट ठेवण्यात आलंय. नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 63 तर नागपूरमध्ये 61 केंद्रे आहेत. यात काटोल 15, सावनेर 11, हिंगणा 7, उमरेड 13, कामठी 7 तर रामटेकमध्ये 10 संवेदशील मतदान केंद्रे आहेत. तर नागपूर लोकसभेंतर्गत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 11, नागपूर दक्षिण 11, नागपूर पूर्व 10, नागपूर मध्य 8, नागपूर पश्चिम 9, नागपूर उत्तर 12 अशा एकूण 61 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या या केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यातील सुमारे 50 टक्के मतदान केंद्राचं वेबकास्टिंग होणार आहे.
रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे : जिल्ह्यात एकूण 4510 मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे आहेत. यात सहाय्यकारी मतदान केंद्रांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथकं आज मतदानस्थळी रवाना होणार आहेत. मतदान पथकांसोबत प्राथमिक वैद्यकीय किट, ग्लुकोज असणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे.
12 महिला मतदान केंद्रे : दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 12 महिला मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक विधानसभेत प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहे. तसंच यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त राहणार असून नागपूर लोकसभेसाठी 321 पोलिस अधिकारी, 4 हजार 250 पोलिस कर्मचारी, 1 हजार 800 होमगार्ड्स यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. तर रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथकं असणार आहेत. संवेदशील केंद्रामध्ये अधिकचे पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करुन देणार आहेत.