मुंबईLok Sabha Election 2024 :निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्वच प्रस्थापित राजकीय पक्षांनी आता आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. जाहीरनाम्यांमध्ये पुढच्या पाच वर्षाच्या विविध विकास कामांच्या आराखड्याची माहिती दिली आहे. त्यानुसार, कोणी 'मोदी की गॅरंटी', तर कोणी 'इंडिया का न्याय' म्हणत देशभरात प्रचार सुरू केलाय. महाराष्ट्रात देखील असंच काही चित्र आहे. न्याय आणि गॅरंटी सोबतच महाराष्ट्रात गद्दारी-खुद्दारी, पुत्रप्रेम, असे मुद्दे निवडणुकीच्या प्रचार सभांचा विषय बनत आहेत. मात्र, या सगळ्यात तृतीयपंथीयांचा राजकीय पक्षांना विसर पडल्याचं दिसून येतय. कारण, तृतीयपंथीयांना ना कोणी न्याय देतेय, ना कोणी त्यांच्या हक्कांची गँरंटी देतंय. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत तृतीयपंथी समाज कोणाच्या बाजूनं उभा राहणार? तृतीय पंथी समाजाचे मुद्दे काय? याचा ईटीव्ही भारतनं आढावा घेतलाय.
तृतीयपंथी सेल सुरू पण जाहीरनाम्यात स्थान नाही :राज्यात सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीनं तृतीयपंथी समाजाला त्यांचा राजकीय प्रतिनिधी दिला. त्या म्हणजे दिशा पिंकी शेख. त्याच्यानंतर इतर राजकीय पक्षांनीही आपल्या इतर अंगीकृत संघटनांप्रमाणेच तृतीयपंथी संघटना उभारली. आता या राजकीय पक्षांना आपल्या अंगीकृत संघटनेच्या विसर पडलाय का? असा प्रश्न पडतो. कारण, राजकीय पक्ष तृतीयपंथी समाजाच्या संघटना सुरू करून निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यात या समाजासाठी कोणतीच घोषणा किंवा कोणतीच योजना देत नसतील तर सर्वच प्रस्थापित राजकीय नेत्यांना आणि पक्षांना तृतीयपंथी समाजाचा विसर पडलाय का? असा प्रश्न पडतो.
राज्यात 5 हजार 617 मतदार :कधीकाळी मतदानाच्या मूलभूत हक्कापासून वंचित असणारा हा समाज आता हळूहळू मुख्य प्रवाहात येत आहे. न्यायालयीन लढाईनंतर या समाजाला निवडणुक लढण्याचा, मतदानाचा अधिकार मिळालाय. मात्र, या अधिकारांचा आता प्रस्थापित राजकीय पक्षांना विसर पडल्याचं दिसतय. एका बाजूला सर्वच राजकीय पक्ष महिला, युवा, वृद्ध अशा सर्वांच्याच मूलभूत सोयी सुविधांवर काम करण्याचं आश्वासन देतात. मात्र, तृतीयपंथी समाज्याच्या मूलभूत अधिकारांचा त्यांना विसर पडतो. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, यावर्षी 5 हजार 617 तृतीयपंथी नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र, या समाजासाठी पुढच्या पाच वर्षात राजकीय नेते नेमके काय काम करणार, हे मात्र स्पष्ट नाहीय.
कुठे किती मतदार? :निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक 1 हजार 279 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. तसंच गोंदियात 10, गडचिरोलीत 9, हिंगोलीत 7, भंडारा 5, सिंधुदुर्गात 01 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. मुंबई शहर, उपनगर मिळून 1 हजार 34, तर पुण्यात 726 तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली आहे. आता मुंबईची विभागवार आकडेवारी पाहिल्यास मुंबईतील पश्चिम उपनगरातील मालाड येथे सर्वाधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मालाड 339, घाटकोपर पश्चिम 120, दहिसर 45, मानखुर्द शिवाजीनगर 39, भांडुप पश्चिम 32, अनुशक्ती नगर 31, दिंडोशी 26, मुलुंड 23, घाटकोपर पूर्व 20 हे मुंबईतील विभागवार तृतीयपंथी मतदारांची आकडेवारी आहे.