महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कराड तालुक्यातील घोगावमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 13 मेंढ्या ठार, साताऱ्यात वन्य प्राण्यांचा सुळसुळाट - LEOPARD ATTACKS SHEEP

सातारा जिल्ह्यात बिबट्याचा नागरी वस्तीतील वावर वाढताना दिसत आहे. तसंच पाळीव प्राण्यांवरील हल्ले देखील वाढले आहेत.

LEOPARD ATTACKS SHEEP
बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2024, 10:48 PM IST

Updated : Dec 14, 2024, 10:54 PM IST

सातारा : कराड-चांदोली मार्गावरील घोगावमध्ये मोकळ्या शेतात बसवलेल्या मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून बिबट्यानं 13 मेंढ्यांचा फडशा पाडला. एका शेतकऱ्यानं पाटील मळी नावाच्या शिवारात मेंढ्या बसवल्या होत्या. शुक्रवारी (13 डिसेंबर) मध्यरात्रीच्या अंधारात त्या ठिकाणी बिबट्यानं येऊन मेंढ्याच्या कळपावर अचानक हल्ला केला. या घटनेमुळं उंडाळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ऊसतोडीमुळं बिबटे पळाले डोंगरी भागात : नदीकाठची ऊसशेती ही बिबट्यांचं आश्रयस्थान बनलं आहे. परंतु, सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू असल्यानं शिवारं रिकामी होत आहेत. त्यामुळं बिबट्यांनी डोंगरी भागाकडे पळ काढला आहे. डोंगराकडेच्या गावात घुसून बिबटे पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. दोन दिवसांपूर्वी येळगाव (ता. कराड) येथे महिलेच्या डोळ्यासमोर बिबट्यानं शेळीवर हल्ला करून तिला फटफटत नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर नजीकच्या घोगावमध्ये बिबट्याने 13 मेंढ्यांचा फडशा पाडला आहे.

साताऱ्यात जंगली प्राण्यांचा मानवी वस्त्यांमध्ये वावर (Source - ग्रामस्थांनी काढलेला व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज)

वन अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा : घोगावमधील एका शेतकऱ्यानं पाटील मळी नावाच्या शिवारात मेंढ्या बसवल्या होत्या. सायंकाळी मेंढ्यांना जाळीमध्ये कोंडून मेंढपाळ शिवारात गेला होता. त्याच दरम्यान बिबट्यानं कळपावर हल्ला केला. त्यात 13 मेंढ्या ठार झाल्या. या घटनेत मेंढपाळाचं मोठं अर्थिक नुकसान झालं आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

बिबट्या, गवे, तरसाचा मानवी वस्तीत वावर : सातारा जिल्ह्यात हिंस्त्र प्राण्यांचा नागरी वस्तीत वावर वाढला आहे. महाबळेश्वर-आंबेनळी घाटात बिबट्याचं सातत्यानं दर्शन होतंय. शुक्रवारी (13 डिसेंबर) रात्री एक गवा चक्क पुणे-बंगळुरू महामार्गावरच आला होता. तर अजिंक्यतारा किल्ल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या माचीपेठेत दोन वेळा तरसाचं दर्शन झालं आहे. रस्त्यावरून फिरणारा तरस सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हेही वाचा

  1. दत्त जयंतीनिमित्त सारंगखेड्यात चेतक फेस्टिवलला सुरुवात; विविध राज्यातील अश्वप्रेमीचा सहभाग
  2. बुलढाणात गर्भलिंग निदान करताना डॉक्टरांना रंगेहात पकडलं; आरोग्य विभागाच्या विशेष पथकाची कारवाई
  3. सॅटर्डे ठरला लॉबिंग डे; मंत्री पदासाठी इच्छुक आमदारांच्या भेटीगाठी वाढल्या
Last Updated : Dec 14, 2024, 10:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details