पुणेLok Sabha Election 2024: देशभरातील विविध राजकीय पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी केली असून राज्यात महाविकास आघाडी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला विविध संस्था संघटनेचा पाठिंबा मिळत असताना भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनगर समाज, वंजारी समाज या समाजाच्यावतीनं पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने, अॅड. माजी आमदार विजय मोरे, अॅड. माजी आमदार उषा दराडे यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्त 'अ', 'ब', 'क', 'ड' या सर्व समाजबांधवांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.
भाजपाला सत्तेतून दूर करण्याचा मानस :पुण्यात आज याबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात पद्मश्री लक्ष्मण माने आणि अॅड. विजय मोरे यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी पद्मश्री लक्ष्मण माने म्हणाले की, संपूर्ण राज्यभर ९ एप्रिल ते ९ मे २०२४ या काळात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भटक्या विमुक्तांच्या मेळाव्यांमधून मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाच्या सर्व बांधवांनी या जयंती महोत्सवात सक्रिय सहभागी व्हावे. भारताची राज्यघटना आणि आपल्याला मिळालेले मूलभूत अधिकार ही आपली कवच कुंडलं आहेत. भारताची राज्यघटना बदलू इच्छिणाऱ्यांना साता समुद्रापार फेकल्याशिवाय आता थांबायचं नाही. संघटितरित्या आरएसएस आणि भाजपाला सत्तेतून दूर केल्याशिवाय थांबवायचं नाही, अशी घोषणा देखील यावेळी पद्मश्री लक्ष्मण माने यांनी केली.