छत्रपती संभाजीनगर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकीत कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याचा फोटो हातात घेऊन मिरवत असल्याचा फोटो सोशल मीडियावर झळकला. त्यांनंतर पोलिसांनी त्या युवकाचा शोध घेत ताब्यात घेतलं. काल क्रांती चौकात शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका तरुणानं कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचे फोटो असलेले बॅनर झळकवले. बिश्नोईचे बॅनर झळकवल्यानं एकच खळबळ उडाली. बॅनर झळकवणाऱ्या विशाल श्याम पवार (साळुंखे) या 21 वर्षे तरुणाला पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या पथकाकडून तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत काही संबंध आहे का? याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मिरवणुकीत बिश्नोईचे पोस्टर :बुधवारी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली गेली. महाराजांच्या पुतळा परिसरात मोठ्या संख्येनं युवक एकत्र आले. ढोल ताशाच्या गजरात जयंती साजरी करत असताना एका युवकानं चक्क प्रसिद्ध गुंड लॉरेन्स बिश्नोई याचे पोस्टर हातात घेऊन सहभाग घेतला. या पोस्टरवर महात्मा गांधी द्वेष असलेली वाक्य लिहिली होती. तर, आम्ही गांधीला नाही तर शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्यासारख्या धुरंधरणा मानणारे आहोत असा मजकूर लिहिला होता. सोशल मीडियावर या युवकाचा फोटो झळकल्यावर शिवभक्तांनी संतप्त भावना व्यक्त केली. तर पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आणि युवकाचा तपास सुरू करण्यात आला.