नांदेड : माळेगाव यात्रेत दुपारी बारा वाजता लावणी महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. अकलूजच्या धर्तीवर माळेगाव यात्रेत 'लावणी महोत्सव' (Lavani Festival 2025) घेतला जातो. माळेगावचं आकर्षण असलेल्या लावणी महोत्सवात यावर्षी 8 संच सहभागी झाले होते. यामध्ये वैशाली वाफळेकर (चौफुला), आशा-रूपा परभणीकर (मोडनिंब), श्यामल स्नेहा लखनगावकर (मोडनिंब), वैशाली परभणीकर (पुणे), यांचा सहभाग होता. तसंच शाहीर प्रेमकुमार मस्के संचलित स्वरसंगम आणि अनुराधा नांदेडकर या संचांचा समावेश होता. लावणी महोत्सवाचं उद्घाटन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलं. या लावणी महोत्सवात लावणी कलावंतांचे ठुमके पाहायला मिळाले, तर रसिकांनीही ठेका धरला.
लावणी पाहण्यासाठी रसिकांची गर्दी :माळेगाव यात्रेची सुरुवात 29 डिसेंबरला झाली. परंतु दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळं 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. याचा माळेगावच्या खंडोबाच्या यात्रेवर थोडा परिणाम झाला. शासकीय कार्यक्रम पुढे ढकलण्यात आले. त्यामुळं आता 2 जानेवारीपासून सर्व कार्यक्रम सुरू झाले आहेत. लावणी पाहण्यासाठी लातूर, हिंगोली, नांदेड, परभणी येथील रसिक मोठ्या संख्येनं आले होते. या लावणी महोत्सवाची सुरुवात तत्कालीन गटविकास अधिकारी सुधाकर शिंदे, सभापती व्यंकटराव मुकदम सेने, निरीक्षक प्राध्यापक निवृत्ती कोसले यांनी आणि इतर मानकरी यांनी केली. राज्यभरात गाजणाऱ्या लावण्या या माळेगाव यात्रेत सादर केल्या जातात. येथे लावणी कलावंतांना मोठं बक्षीस देखील आयोजकांकडून देण्यात येतं. जिल्हा परिषद नांदेड आणि ग्रामपंचायत माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा भरवली जाते.