मुंबई Pooja Chavan Suicide Case : पुण्यात घडलेल्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी पूजा चव्हाण हिचे वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीला विरोध केला. फेब्रुवारी 2021 मध्ये पुण्यातील पूजा चव्हाण हिचा तिच्या घराच्या बाल्कनीतून पडून मृत्यू झाला. त्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करुन त्या प्रकरणाची चौकशी सीबीआयनं करावी, अशी मागणी केली. मात्र या प्रकरणी आपली कोणतीच तक्रार नसल्याचा दावा पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. पूजा चव्हाण हिचे वडील लहू चव्हाण आणि तिच्या चार बहिणींना या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर कोणतीही शंका नाही, त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडं देण्याची काय आवश्यकता आहे, असा सवालही यावेळी वकिलांनी केला.
पूजा चव्हाण प्रकरणात कोणतीही तक्रार नाही- लहू चव्हाण :पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी दिवंगत पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी या प्रकरणात आपली कोणतीही तक्रार नाही. सीबीआय चौकशी करण्याची आपली कोणती मागणी नसल्याचं त्यांनी न्यायालयासमोर स्पष्ट केलं. राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बीरेंद्र सराफ आणि पुणे पोलिसांची बाजू मांडणारे उच्च न्यायालयाचे सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याच्या याचिकादारांच्या मागणीला विरोध केला. याप्रकरणी महानगर दंडाधिकारी यांनी त्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकडं अनेकदा फेटाळून लावल्याच्या बाबीकडं त्यांनी खंडपीठाचं लक्ष वेधलं.