सातारा Ladki Bahin Yojana Ratnagiri : साताऱ्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा झाल्यानंतर आता रत्नागिरीत कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. लाभार्थी महिलांना कार्यक्रमाला नेण्यासाठी सातारा जिल्ह्यातून एसटी बस रत्नागिरीला मागविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातून सर्व डेपोमधून 144 गाड्या रत्नागिरीला गेल्यामुळं साताऱ्यातील एसटीचं वेळापत्रक कोलमडलं आहे.
सातारा जिल्ह्यातील 144 गाड्या रवाना : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचा रत्नागिरीत भव्य मेळावा आयोजित करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यात एसटी आगारांची आणि एसटी गाड्यांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळं सातारा जिल्ह्यातून एसटी बस मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार सातारा, कराड आणि फलटण या मोठ्या आगारांतून प्रत्येकी 20 आणि पाटण, वाई, महाबळेश्वर, मेढा, वडूज, दहिवडी आणि खंडाळा या आगारांतून प्रत्येकी 12 एसटी बस रत्नागिरीला रवाना झाल्याची माहिती कराड आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ यांनी सांगितलं.
- सातारा जिल्ह्यातील एसटीचं वेळापत्रक कोलमडलं : तीन दिवसांसाठी 144 एसटी बसेस रत्नागिरीला गेल्यामुळं सातारा जिल्ह्यातील एसटी सेवेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. अनेक गावांच्या फेऱ्या आणि मुक्कामी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं नोकरदार, ज्येष्ठ नागरीक आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.