नवी मुंबई Ladki Bahin Yojana : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेत महिलांना सरकारकडून 1500 रुपये मदत दिली जात आहे. नवी मुंबई महापालिका परिसरातील तब्बल 50 हजारापेक्षा जास्त लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्यात लाभ देण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून तब्बल 1.25 लाखाहून अधिक अर्ज पात्र झाले. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 50 हजाराहून अधिक पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांच्या लाभाची 3 हजार रुपयाची रक्कम जमा झालेली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील 78 हजारहून अधिक महिलांची लाभ रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीनं सूत्रांनी दिली आहे.
तातडीनं दोन वॉर रूम स्थापित :महानगरपालिकेच्या वतीनं योजनेचे अर्ज भरण्यासोबतच विहित वेळेत अर्ज निकाली निघावेत यादृष्टीनं समांतर पद्धतीनं अर्ज पडताळणीची प्रक्रिया करण्यात येत आहे. यासाठी मुख्यालय स्तरावर अर्ज पडताळणीसाठी तातडीनं दोन वॉर रूम स्थापित करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी 3 शिफ्टमध्ये 24 तास काम होईल, अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची आणि त्यावर पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली. पडताळणीचं काम नियोजनबद्धरित्या सुरू झाल्यानंतर विहित वेळेत पडताळणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं समाजविकास विभागाच्या वतीनं परिमंडळ आणि विभाग कार्यालयांच्या सहकार्यानं गती देण्यात आली. अशा प्रकारे दुसऱ्या टप्प्यातील 99 टक्क्यांहून अधिक अर्ज छाननीचं काम पूर्ण करण्यात आलं. नव्यानं प्राप्त होत असलेल्या अर्ज छाननीचं कामही सुरू आहे.