नाशिक- महाकुंभ मेळाव्यातील दुर्घटनेनंतर नाशिककरांना २००३ मधील सिंहस्थ कुभमेळ्याच्या दुर्घटनांचं स्मरण होऊ लागलं आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं? नेमण्यात आलेल्या चौकशी आयोगाचं काय झालं होतं?
जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव अशी ओळख असलेल्या महाकुंभ मेळाव्यात बुधवारी रात्री दोननंतर प्रयागराज येथील संगमावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झाल्यानंतर नाशिककरांची चिंता वाढली आहे. कारण, 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू असताना महाकुंभ मेळाव्यातील दुर्घटना घडली आहे. त्यामुळे नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी प्रशासनाला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
नाशिकला पंचवटीतील सरदार चौकात 27 ऑगस्ट 2003 मध्ये शाही मिरवणूक निघाली. अरुंद मार्गावर चेंगराचेंगरी होऊन 29 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यात 26 महिलांचा समावेश होता. तर 118 भाविक जखमी झाले होते. प्रयागराजला घडलेल्या घटनेनं 22 वर्षांपूर्वी सिंहस्थात घडलेल्या दुर्घटनेचं अनेकांना स्मरण होत आहे. नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिहस्थ कुंभमेळा भरतो. मात्र, 2003 साली कुंभमेळाच्या दुःखद आठवणी आजही नाशिककरांच्या मनातून जात नाहीत.
अरुंध मार्गावरून गेल्यानं घडली होती दुर्घटना-2003 साली देश-विदेशातून भाविक नाशिकच्या सिहस्थ कुंभमेळ्यात आले होते. पहिले शाही स्नान संपून दुसऱ्या शाही स्नानासाठी साधू-महंत पंचवटीतील सरदार चौकातून गोदावरी नदीवर येत होते. हत्ती आणि घोड्यावर स्वार होऊन निघालेला साधू-महंताचा ताफा सरदार चौकातून मार्गस्थ होत असतानाच चेंगराचेंगरी झाली. वास्तविक हा मार्ग अरुंद असून स्थानिक प्रशासनानं येथून न जाण्याची सूचना दिली होती. मात्र, भाविकांच्या गर्दीत या सूचनेचा साधू-महंतांना विसर पडला. वाजत-गाजत साधू महंतांची स्वारी हत्ती- घोड्यावरून तिथून निघाली. यावेळी महंतांनी चांदीची नाणी आणि चॉकलेट्स उधळल्यानं ते घेण्यासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली. त्या गर्दीत चेंगराचेंगरीची घटना होऊन अनेक भाविकांना प्राण गमवावा लागला होता.