नाशिक Krishna Janmashtami 2024 :नाशिक शहरातील जुने नाशिक भागात असलेल्या कापड बाजार परिसरात 200 वर्ष पुरातन श्री मुरलीधर मंदिर आहे. या मंदिरात सध्या श्री कृष्ण जन्मोत्सव सुरू आहे. दहा दिवसांच्या या उत्सवकाळात मंदिरात श्री मुरलीधराची विविध रूपं साकारली जातात. तसंच यादरम्यान मंदिरात विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडतात.
मंदिरात श्री कृष्णाच्या विविध रूपांचं दर्शन :नाशिक शहराची धार्मिक आणि आध्यात्मिक शहर म्हणून ओळख आहे. इथं लहान, मोठी अशी दोन हजाराहून अधिक मंदिरं आहेत. यातील बहुतांश पुरातन मंदिरं आहेत. यातीलच एक मंदिर म्हणजे नाशिकच्या कापड बाजारातील श्री मुरलीधर मंदिर. 200 वर्ष जुन्या या मंदिरात अखंड पाषाणातील साडेतीन फुटाची श्री कृष्णाची मूर्ती आहे. 1826 साली गुंडराज महाराजांनी या मंदिराची स्थापना केली. आज त्यांची 14 वी पिढी या मंदिराचं व्यवस्थापन बघत आहे. दरवर्षी श्री कृष्ण जन्मोत्सव या मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दहा दिवस या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. या दरम्यान श्री मुरलीधराची विविध रूपं साकारली जातात. यात झुल्यावर विराजमान कृष्ण, शेषनाग, मोर, मोहिनी, अर्धनारीनटेश्वर, झुल्यावर कृष्ण रूप, गरुडावर विराजमान कृष्ण, रथावर विराजमान कृष्ण, घोंगडीवाला कृष्ण अशा विविध प्रकारची रूपं साकारली जातात. कृष्णाची ही विविध रूपं बघण्यासाठी भाविक या मंदिरात गर्दी करत असतात.