मुंबई/नवी दिल्ली Pakistan Independence Day Status : कलम 370 रद्द करण्यावर टीका करणे तसंच पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणे हा गुन्हा मानला जाणार नाही, असा ऐतिहासिक निर्णय देत सर्वोच्च न्यायालयानं व्हॉट्सॲप स्टेटसमुळं घेरलेल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला दिलासा दिलाय. कोल्हापुरातील संजय घोडावत महाविद्यालयातील जावेद अहमद या प्राध्यापकानं कलम 370 हटविण्याविरोधात आणि पाकिस्तानला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस व्हॉट्सॲपवर ठेवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश अभय ओक आणि उज्ज्वल भुयाण यांच्या खंडपीठानं सदर एफआयआर रद्दबातल ठरवला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? :ऑगस्ट 2022 मध्ये कोल्हापूरच्या महाविद्यालयातील जावेद अहमद या प्राध्यापकानं पालक आणि शिक्षक यांच्या एका व्हॉट्सॲप ग्रुपवर दोन मॅसेज शेअर केले होते. त्यापैकी एकात ‘5 ऑगस्ट हा जम्मू-काश्मीरसाठी काळा दिवस’ असल्याचं म्हटलं होतं. तर दुसऱ्या मॅसेजमध्ये पाकिस्तानला 14 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनाबाबत शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. याशिवाय त्यानं हा मॅसेज स्वतःच्या व्हॉट्सॲप स्टेटसवरही ठेवला होता. तसंच कलम 370 हटविल्याबाबतही त्यानं टीका केली होती. त्यानंतर या स्टेटसवरुन कोल्हापूरमधील हातकणंगले पोलीस ठाण्यात कलम 153-अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.