महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबाबाई किरणोत्सव; मावळतीच्या सूर्यकिरणांनी अंबाबाई देवीला घातला अभिषेक

Kiranotsav In Ambabai Mandir : करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला असून, आज मावळतीची किरणे अंबाबाईच्या मुखापर्यंत गेल्याने यंदाच्या वर्षातील किरणोत्सव सोहळा संपन्न झाला आहे.

Kiranotsav In Ambabai Mandir
अंबाबाई किरणोत्सव

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 31, 2024, 10:15 PM IST

Updated : Feb 1, 2024, 5:28 PM IST

प्रतिक्रिया देताना मिलिंद कारंजकर

कोल्हापूर Kiranotsav In Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात तिसऱ्या दिवशी मावळतीच्या सूर्यकिरणांनी अंबाबाई मूर्तीच्या चेहऱ्याला स्पर्श केला. अंबाबाईचा वर्षातून दोनदा किरणोत्सव सोहळा पार पडतो. या सोहळ्यात मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून अंबाबाई मंदिरात प्रवेश करतात. प्रवासाचा एक एक टप्पा पार करत पहिल्या दिवशी किरणे अंबाबाईच्या मूर्तीचा चरण स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी कमरेपर्यंत आणि तिसऱ्या दिवशी ही किरणे चेहऱ्यावर येऊन किरणोत्सव पूर्ण होतो. आज मावळतीची किरणे अंबाबाईच्या मुखापर्यंत गेल्याने यंदाच्या वर्षातील किरणोत्सव सोहळा संपन्न झाला. सूर्यकिरणांनी अंबाबाई देवीच्या उत्सव मूर्तीवर अभिषेक घातल्याने भाविकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.


किरणोत्सव सोहळा संपन्न: आज स्वच्छ सूर्यप्रकाश आणि मंदिरात आर्द्रता चांगली असल्यामुळं सायंकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी सूर्यकिरणांनी संगमरवरी पहिल्या पायरीला स्पर्श केला. देवीच्या चरणाच्या खालच्या बाजूला असलेल्या कटांजली भागात 6 वाजून 13 मिनिटांनी सूर्यकिरणे पोहोचली. 6 वाजून 14 मिनिटांनी मावळतीच्या सूर्यकिरणांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचा चरण स्पर्श केला. मंदिरातील गाभाऱ्यात आर्द्रता चांगली असल्यामुळं 6 वाजून 18 ते 19 मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरण आई अंबाबाईच्या मुखावर पडली. यामुळं यंदाच्या वर्षातील उत्तरायण मधील पहिला किरणोत्सव सोहळा संपन्न झाला असल्याची माहिती, किरणोत्सव सोहळ्याचे अभ्यासक मिलिंद कारंजकर यांनी दिली.



हेमाडपंथी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना : मंदिर वास्तुशास्त्रतील असाच एक अजोड नमुना म्हणजे साडेतीन शक्तिपीठांतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे मंदिर. हेमाडपंथी बांधकाम असलेल्या या मंदिराची रचनाच अशी आहे की, दरवर्षी नोव्हेंबर 9, 10, 11 आणि जानेवारी 31, फेब्रुवारी 1 आणि 2 या तारखांना न चुकता मंदिरात उत्तरायण आणि दक्षिणायन काळातील हा किरणोत्सवाचा सोहळा होतो. मावळतीला आलेली सूर्यकिरणे पहिल्या दिवशी अंबाबाईच्या मूर्तीचा चरण स्पर्श करतात. दुसऱ्या दिवशी ती कमरेर्पंयत येतात आणि तिसऱ्या दिवशी ती चरणांपासून ते मूर्तीच्या मुखावर पडून पूर्ण मूर्ती आपल्या तेजाने उजळवून टाकतात. अवघ्या सात ते दहा मिनिटांच्या कालावधीत सूर्यकिरणांच्या प्रवासाचा हा अद्भुत चमत्कार घडतो.


अजूनही अडथळ्यांची शर्यत: अंबाबाई मंदिर परिसरात झालेली अतिक्रमणं, वातावरणातील धुलीकण यामुळं बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या अंबाबाई मंदिरातील किरणोत्सव अडथळ्यांची शर्यत ठरत आहे. प्रशासनानं किरणोत्सव मार्गात येणाऱ्या अतिक्रमणांना हटवावे आणि पूर्ण क्षमतेने किरणोत्सव व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र अजूनही अनेक इमारतींच्या गॅलरी, पत्रे सूर्यकिरणांच्यामध्ये येत असल्यामुळं मंदिरात येणाऱ्या सूर्यकिरणांची तीव्रता कमी होत आहे. त्यामुळं अजूनही किरणोत्सव मार्गात अडथळा निर्माण होत आहे.

हेही वाचा -

  1. Video : अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवाचा चौथा दिवस खास 'ईटीव्ही भारत'च्या प्रेक्षकांसाठी
  2. कोल्हापूर- व्हीआयपीकडून मंदिरात बूट घालून प्रवेश, गुन्हा दाखल करण्याची भाविकांची मागणी
  3. Ambabai mandir : अंबाबाई मंदिरातील जुना लाकडी दरवाजा बदलला; नवीन सागवानी दरवाजा सेवेत
Last Updated : Feb 1, 2024, 5:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details