मुंबई Graduate Constituency Election 2024 :शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 साठी आज मतदान होत आहे. या मतदार संघात भाजपा, महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांची लढत उबाठा गटाचे उमेदवार अनिल परब यांच्यासोबत होत आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मुंबईतील पराभवानंतर ही निवडणूक महायुतीसाठी फार महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत या मतदारसंघातून आपलाच विजय होईल, असा ठाम विश्वास किरण शेलार यांनी व्यक्त केला आहे. तर वर्षानुवर्ष आमचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात आमचाच विजय होईल, असा ठाम विश्वास उबाठा गटाच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केला. मुंबईत मतदान केल्यानंतर या दोघांनी प्रतिक्रिया दिली आहे.
विजय माझाच आहे, किरण शेलारांना विश्वास :मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 साठी आज मतदान होत असून मुंबईतील वरळी इथल्या मतदान केंद्रावर भाजपा, महायुतीचे उमेदवार किरण शेलार यांनी मतदान केलं. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना किरण शेलार म्हणाले की, "मी मतदानाचा हक्क बजावला आहे. वरळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मतदार मतदान करत आहेत. मागच्या 8 दिवसांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या घटक पक्षांनी घेतलेल्या मेहनतीचा परिणाम दिसून येत आहे. प्रत्येक निवडणूक ही आव्हानात्मक असते. प्रचारात कितीही आरोप झाले, तरी मतदार सुज्ञ आहेत. त्यांना माहीत आहे कोणाला मतदान करायचं आहे. जास्तीत जास्त मुंबईकरांनी पुढं येऊन मतदान करावं, हीच विनंती आहे. माझा विजय निश्चित आहे."