बंगळुरू(कर्नाटक) Prajwal Revanna Video : हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना याच्यावर लैंगिक छळाचा (Karnataka Sex Scandal) आरोप आहे. 31 मे रोजी खटल्यांची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर हजर राहणार असल्याचं प्रज्वल रेवन्ना यानं सांगितलं आहे. प्रज्वलनं कन्नड टीव्ही चॅनलवर प्रसारित केलेल्या व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिली.
न्यायालयावर विश्वास : प्रज्वल रेवन्ना व्हिडिओमध्ये म्हणाला, "मी शुक्रवार, 31 मे रोजी सकाळी 10 वाजता एसआयटीसमोर वैयक्तिकरित्या हजर राहीन आणि तपासात सहकार्य करुन आरोपांना उत्तर देईन. माझा न्यायालयावर विश्वास असून, खोट्या खटल्यांतून मी न्यायालयाच्या माध्यमातून बाहेर पडेन, असा विश्वास आहे." तो पुढं म्हणाला, "देव, लोक आणि कुटुंबाचा आशीर्वाद माझ्यावर असो. मी शुक्रवार, 31 मे रोजी निश्चितपणे एसआयटीसमोर हजर होईन. परत आल्यानंतर हे सर्व संपवण्याचा प्रयत्न करेन. माझ्यावर विश्वास ठेवा."
'ब्लू कॉर्नर नोटीस' जारी :'सीबीआय'मार्फत 'एसआयटी'नं केलेल्या विनंतीनंतर, इंटरपोलनं प्रज्वल रेवन्नाच्या ठावठिकाणाविषयी माहिती मागणारी 'ब्लू कॉर्नर नोटीस' आधीच जारी केली आहे. 'एसआयटी'नं दाखल केलेल्या अर्जानंतर विशेष न्यायालयानं 18 मे रोजी प्रज्वल रेवन्ना विरुद्ध अटक वॉरंट जारी केलं. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कर्नाटक सरकारनं त्याचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केंद्राकडं केली.