मुंबई Indias Youngest Mountaineer :काम्या कार्तिकेयन या 12 वी च्या विद्यार्थिनीनं वयाच्या 16 व्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करून विक्रम केलाय. इतक्या कमी वयात माऊंट एव्हरेस्ट सर करणारी ती पहिली भारतीय आणि जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगी ठरली आहे. काम्याचे वडील नौदलात सेवा अधिकारी असून काम्यानं वडिलांसोबत (नौदल कमांडर एस कार्तिकेयन) 20 मे रोजी एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी चढाई केली. काम्या आणि तिच्या वडिलांच्या या यशाबद्दल भारतीय नौदलानं त्यांचं अभिनंदन केलंय.
भारतीय नौदलाच्या मुंबई डीव्हिजननं दिलेल्या माहितीनुसार, काम्या कार्तिकेयन मुंबईच्या नेव्ही चिल्ड्रन स्कूलची विद्यार्थिनी आहे. गिर्यारोहणातील सहा महत्त्वाची उद्दिष्ट साध्य करण्यात काम्याला यश आलंय. सोबतच काम्या येत्या डिसेंबरमध्ये अंटार्क्टिकामधील माऊंट विन्सन मॅसिफवर चढून सात शिखरांवर विजय मिळवणाऱ्या सर्वात तरुण मुलीचा विक्रम करणार आहे. काम्या आणि तिचे वडील कमांडर एस कार्तिकेयन यांनी 20 मे ला एव्हरेस्टवर (8,849 मीटर) यशस्वी चढाई केली. या कामगिरीसह, ती जगातील दुसरी सर्वात तरुण मुलगी आणि जगातील सर्वोच्च शिखर सर करणारी नेपाळमधील सर्वात तरुण भारतीय गिर्यारोहक ठरली आहे.
कार्तिकेयन ही सर्वात तरुण भारतीय ठरली!काम्यानं सातही खंडांतील सर्वोच्च शिखर सर करण्याच्या तिच्या मोहिमेतील सहा टप्पे पूर्ण केलेत. '7 समिट्स चॅलेंज' पूर्ण करणारी सर्वात तरुण मुलगी होण्यासाठी आता येत्या डिसेंबरमध्ये अंटार्क्टिकामधील माऊंट विन्सन मॅसिफवर चढाई करण्याचं तिचं ध्येय आहे. काम्या कार्तिकेयननं एवढ्या कमी वयात माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या अभूतपूर्व कामगिरीचा आम्हाला अभिमान असल्याचं नौदलानं म्हटलंय. तिचा हा प्रवास चिकाटी, जिद्द, तयारी आणि अविचल दृढनिश्चयाचा पुरावा असल्याचं देखील नौदलानं म्हटलंय. काम्या कार्तिकेयनच्या या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेचं खास वैशिष्ट्य म्हणजे तीनं हे शिखर नेपाळमधून सर केलं. त्यामुळं वयाच्या 16 व्या वर्षी नेपाळच्या बाजूनं जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट जिंकणारी काम्या कार्तिकेयन ही सर्वात तरुण भारतीय ठरली आहे.