ठाणे :कल्याण पूर्वेतील चक्कीनाका भागातील एका 12 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील बापगाव इथं हत्या करण्यात आल्यानं खळबळ उडाली. या हत्येप्रकरणी कोळसेवाडी भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मुख्य सूत्रधार विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथून, तर त्याच्या पत्नीला कल्याण शहरातून पोलिसांनी अटक केली. शिवाय या गुन्ह्यात मदत करणाऱ्या एका रिक्षा चालकाला अटक करून त्याची रिक्षाही जप्त करण्यात आली, अशी माहिती कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे. या हत्येप्रकरणी कल्याण शहर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कल्याण परिसरात चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या :उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना सांगितलं, की अल्पवयीन चिमुकलीच्या हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांचा सीसीटीव्ही चित्रणातील माहितीच्या आधारे सहा पोलीस पथकांच्या माध्यमातून तपास सुरू आहे. या प्रकरणात विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथून ताब्यात घेण्यात आलं. त्याला 25 डिसेंबर रोजी रात्री उशीरा ठाणे क्राईम पथकानं ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे. आज या नरधमाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळं कल्याण न्यायालय परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या गुन्ह्यात विशालच्या पत्नीचा सहभाग असल्याच्या संशयावरुन तिलाही अटक करण्यात आली आहे. आज सकाळी तिला भिवंडीतील बापगाव येथील घटनास्थळी पोलीस पथक तपासासाठी घेऊन गेले. या प्रकरणात आणखी काही आरोपी सहभागी आहेत का, यादृष्टीनं सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे शोध घेतला जात आहे.
नराधम विशाल सराईत गुन्हेगार :नराधम विशालवर यापूर्वी विनयभंग, जबरी चोरी, मारहाण असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी दोन प्रकरणात त्याला तडीपाराची शिक्षा झाली. अलीकडंच तो जामिनावर बाहेर आला होता, असं पोलीस सूत्रानं सांगितलं. विशालची यापूर्वी दोन लग्नं झाली आहेत. कल्याण पूर्वेत त्याची दहशत होती. सध्या तो तिसऱ्या पत्नीसोबत राहत असून ती पत्नी एका खासगी बँकेत नोकरी करत आहे.