ठाणे :कल्याण शहरात दोन मतदार संघ आहेत. या ऐतिहासिक नगरातील सुभेदारीवरुन महायुतीमध्ये बंडाळी होऊन भाजपा आणि शिवसेनेच्या मातब्बर नेत्यांनी बंडखोरी केली आहे. त्यांच्या बंडखोरीमुळं महायुतीच्या दोन्ही उमेदवारांची वाट बिकट झाल्याचं दिसून आलंय.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांना पुन्हा मैदानात उतरवल्यानं भाजपाच्या माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह भाजपाचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी बंडाचा झेंडा फडकावत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. मात्र, त्यानंतर नरेंद्र पवार यांनी माघार घेतली. दुसरीकडं या मतदारसंघातून महविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिन बासरे तर मनसेचे उल्हास भोईर रिंगणात असल्यानं या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या लढाईत युतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपाकडून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आलीय. मात्र, त्यांच्या उमेदवारीला जाहीर आव्हान देत शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी हजारो समर्थकांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. तर या मतदारसंघात शिवसेनेकडून (उबाठा) धनंजय बोडारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
दोन्ही मतदारसंघात होणार 'काटे की टक्कर' : कल्याण पश्चिम मतदारसंघातून 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. इथं वंचित बहुजन आघाडीकडून अयाज मोलवी, तर मनसे कडून उल्हास भोईर तसंच जिजाऊ संघटनेकडून राकेश मुथ्था हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळं याचा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच कल्याण पूर्व मधून 17 उमेदवार निवडणूक लढवणार असून यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक विशाल पावशे यांना मैदानात उतरवण्यात आलंय. त्यामुळं इथंही 'काटे की टक्कर' होणार आहे.
...तेव्हा भाजपाचा युतीधर्म कुठं गेला होता? : कल्याण पूर्वेचा विकास करण्यासाठीच आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं महेश गायकवाड यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं. तसमच भाजपानं आम्हाला युती धर्म शिकवू नये. कारण, भाजपाच्या याच उमेदवारानं लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात प्रचार केल्याची चर्चा होती. तेव्हा भाजपाचा युतीधर्म कुठं गेला होता? असा प्रश्नही त्यांनी अर्ज दाखल करताना उपस्थित केला होता. दरम्यान, कल्याण पश्चिममधून बंडखोरी करणारे भाजपा शहर अध्यक्ष वरुण पाटील यांचं भाजपातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्याचं जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी जाहीर केलंय. तर कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांचंही पक्षातून निलंबित करण्यात आल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी जाहीर केलंय.
हेही वाचा -
- अक्कलकुवा मतदारसंघात चुरशीची लढत, कॉंग्रेस गड राखणार? 'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!
- बुलढाण्यात कोण बाजी मारणार? महाविकास आघाडी-महायुतीच्या थेट लढती? सात मतदारसंघातील राजकीय चित्र स्पष्ट
- मुलुंडमध्ये भाजपा गड राखणार की महाविकास आघाडी मुसंडी मारणार? जाणून घ्या मतदारसंघाची गणितं