बीडMedia Worker Death :घोडबंदर ठाणे येथे राहणारे पत्रकार वैभव कनगुटकर (वय 45 वर्षे) हे मुंबईवरुन वृत्तवाहिनीसाठी वार्तांकन करण्यासाठी अंबाजोगाईतील राज हॉटेल इथं रविवारी रात्री पत्रकारांसोबत मुक्कामी होते. सकाळी सात वाजता बाहेर पडून लाईव्ह वार्तांकन केल्यानंतर पंचायत समिती अंबेजोगाई येथील बुथवर वार्तांकन करण्यासाठी गेले असता त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांनी ड्रायव्हर असलेल्या त्यांच्या मित्रास मला ऍसिडिटीचा त्रास होतोय. गोळी घेऊन ये, म्हणून मेडिकलवर पाठवले. तो गोळी घेऊन येण्याच्या अगोदरच वेदना तीव्र झाल्यानं त्यांना इतर पत्रकार बांधवांनी प्रथम जवळच असलेल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारांसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथे घेऊन जा म्हटल्यामुळे त्यांना तिथं नेण्यात आलं, असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
रात्री पत्नीला कॉल करुन झोपले, सकाळी मृत्यू :घरदार सोडून लाईव्ह वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकार वैभव यांचं दुःखद निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली असा परिवार असून त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह ठाणे येथे पाठविला जाणार आहे. तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी नऊ वाजता नात्रा येथे पंकजा मुंडे यांचे मतदान करतानाचे लाईव्ह वार्तांकन सर्व न्यूज चॅनलच्या टीमला करायचे होते. ते तीन गाड्यांसह आठ ते दहा लोक आले होते, मात्र वैभव कनगुटकर यांच्या अकाली निधनानं हे सर्व वार्तांकन स्थगित केले. काल रात्रीच पत्रकार वैभव यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. वाढदिवसामुळे पत्नीशी व्हिडिओ कॉलवर कुटुंबीयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ते रात्री झोपले होते आणि आज सकाळी त्यांचा हा दुर्दैवी मृत्यू कुटुंबीयांसाठी मोठा आघात आहे.