मुंबई Jayant Patil on vinesh phogat :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटनं महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेत क्युबाची कुस्तीपटू युसनेइलिस गुझमनचा 5-0 ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. परंतू विनेश फोगाट हिचं वजन वाढल्यामुळे महिलांच्या 50 किलो वजनी गटातून तिला अपात्र ठरविण्यात आलं. त्यामुळे देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीट करत भावूक प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'मोदी है तो मुमकिन है' असं म्हणत मोदींना टोला लगावला आहे.
50-100 ग्रॅम वजन कसं वाढलं ? : "विनेश फोगाटचा परफॉर्मन्स गेले काही दिवस अतिशय उत्तम होता. मग अचानक काय झालं? 50-100 ग्रॅम वजन कसं वाढलं? सूत्र कुठून हलली कशी हलली? याविषयी शंका निर्माण होत आहे. विनेश फोगाटला सरकारनं दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक सर्वांना माहिती आहे. ते आठवून आपल्या विरोधी लाट निर्माण होईल, असं कोणाला वाटलं का? त्यामागे काही षडयंत्र असू शकते का? याचा अभ्यास आणि चौकशी करणे गरजेचं आहे. " विनेश फोगाटबाबत जे घडत आहे ते रोखायला हवं. "मोदी है तो मुमकिन हैं" असा म्हणत जयंत पाटील यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
सरकारचे काळे कारनामे समोर आणणार : जयंत पाटील म्हणाले की, "महायुती सरकारच्या काळातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, राज्यातून बाहेर गेलेले उद्योगधंदे यामुळे महाराष्ट्र अधोगतीला गेला आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून जनजागरण करण्याच्या उद्देशानं जनतेसमोर जाऊन महाराष्ट्रातील युती सरकारचे काळे कारनामे 'शिवस्वराज्य यात्रे'च्या माध्यमातून समोर आणणार आहोत. पक्षाचे नवनिर्वाचित खासदार आणि आमदार या यात्रेत सहभागी होतील. शिवनेरी येथून 9 ऑगस्टला 'शिवस्वराज्य यात्रे'च्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे," अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.