महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ज्येष्ठ रंगकर्मी दिग्दर्शक, नाटककार सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर - JANASTHAN AWARD ANNOUNCED

दिग्दर्शक, नाटककार अभिनेते सतीश आळेकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यावर्षीचा जनस्थान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डहाके आणि केतकर यांनी पुरस्काराची घोषणा केली.

सतीश आळेकर
सतीश आळेकर (File image)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2025, 3:21 PM IST

नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या जनस्थान पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा जनस्थान पुरस्कार मराठी नाटककार,अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून ओळख असलेले सतीश आळेकर यांना जाहीर करण्यात आला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे या मानाच्या पुरस्काराचं वितरण 10 मार्च रोजी गुरुदक्षिणा सभागृहात नाशिक येथे होणार आहे. एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं जनस्थान पुरस्काराचं स्वरुप असल्याचं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आलं.


घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, महापूर, बेगम बर्वे या नाटकांसाठी प्रसिद्ध आणि भारतीय रंगभूमीवर प्रभावशाली प्रगतिशील नाटककार म्हणून आळेकर सर्वपरिचित आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके आणि पुरस्कार समितीचे अध्यक्ष कुमार केतकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली. वयाच्या 75 व्या वर्षीही सतिष आळेकर हे ठकीशी संवाद या नाटकाद्वारे रंगभूमीवर सक्रिय आहेत. महानिर्वाण नाटकाची यंदा 50 वर्ष होत आहेत. ड्युक विद्यापीठातील अध्यापन, एनएसडीचे संचालक पद, नाटकककार विकास योजना, प्रादेशिक थिएटर ग्रुप डेव्हलपमेंटची संकल्पना, फोर्ड फाउंडेशन यातील सक्रिय सहभाग, आंतरराष्ट्रीय नाटकांच्या अनुवाद प्रकल्पांना सहकार्य, ललित कला केंद्राचे प्रमुखपद आणि नाटक, चित्रपट यासाठी अजूनही आळेकरांचा सक्रिय सहभाग या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार करून त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

सतीश आळेकर कोण आहेत- सतीश वसंत आळेकर हे मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. पुण्याच्या थिएटर अकादमीचे संस्थापक सदस्य आहेत. महानिर्वाण (1974), महापूर (1975), अतिरेकी (1990), पिढीजात (2003), मिकी अनी मेमसाहिब (1973),आणि बेगम बर्वे (1979) ही नाटकं त्यांनी दिग्दर्शित केली आहेत. महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर यांच्यासमवेत ते आधुनिक मराठी आणि भारतीय रंगभूमीवरील सर्वात प्रभावशाली आणि प्रगतीशील नाटककार मानले जातात.

सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके - महानिर्वाण, मिकी आणि मेमसाहेब, बेगम बर्वे, शनिवार रविवार, दुसरा सामना, अतिरेकी, पिढीजात लोकजात, एक दिवस मठाकडे, ठकीशी संवाद


ज्यांना पूजले त्यांच्या नावाने पुरस्कार हे भाग्य - तरुणपणात आम्ही बेगम बर्वे, घाशीराम कोतवाल, महानिर्वाण अशा नाटकांसाठी जे आवर्जून उपस्थित राहिले आणि नंतर पोस्ट कार्डद्वारे आपल्या भावनाही लिहून पाठवल्या अशा कुसुमाग्रजांनी सुरू केलेला यंदाचा पुरस्कार मला मिळाला हा आम्ही नाट्यवर्तुळाचा सन्मान मानतो. आता वयाच्या 75 वर्षी माझ्याकडून नाटक लिहून होणे त्याचवेळी साहित्य विश्वातील एवढा मानाचा पुरस्कार मिळणे हे केवळ अद्वितीय आनंददायी असल्याचे मत नाटककार सतीश आळेकर यांनी व्यक्त केलं.


आतापर्यंत साहित्यातील 17 मान्यवरांचा सन्मान - 1991 पासून जनस्थान पुरस्कार दर वर्षी देण्यात येतो. आतापर्यंत विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर, इंदिरा संत, व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ, श्री. ना. पेंडसे, नारायण सुर्वे, मंगेश पाडगावकर, ना. धों. महानोर, बाबुराव बागुल, अरुण साधू, महेश एलकुंचवार, भालचंद्र नेमाडे, वसंत डहाके, विजया राजाध्यक्ष, मधू मंगेश कर्णिक, अशा बगे यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

हेही वाचा...

Vishnu Das Bhave Award : रंगभूमी दिनानिमित्त विष्णूदास भावे पुरस्काराने जेष्ठ दिग्दर्शक सतीश आळेकर सन्मानित...

ABOUT THE AUTHOR

...view details