जळगाव : जळगाव महापालिकेमध्ये नियुक्त ऑपरेटर कंत्राटी कर्मचारी महिलेऐवजी तिचा पती काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हा प्रकार समोर आल्यानंतर महापालिका यंत्रणेत खळबळ उडाल्याचं बघायला मिळतंय.
नेमकं काय आहे प्रकरण? :मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री कार्य-कौशल्य योजनेअंतर्गत सदरील महिलेची महापालिकेत जन्म मृत्यू नोंद विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून महिलेऐवजी तिचा पती काम करत असल्याचं सांगितलं जातय. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली असून याबाबत जन्म मृत्यू नोंद विभागाच्या विभाग प्रमुखांकडून अहवाल मागवण्यात आलाय. तर या प्रकरणाचा अहवाल तसंंच स्थळ निरीक्षण अहवाल आल्यानंतर विभागप्रमुख संबंधित महिला आणि तिच्या पतीवर कायदेशीर कारवाई करतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय. महिलेऐवजी तिचा पती गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून काम करत असतानाही ही बाब महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कशी लक्षात आली नाही? असा सवालही आता उपस्थित केला जातोय.
महापालिका उपायुक्त अश्विनी गायकवाड यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter) महिलेचा पती काय म्हणाला? :"माझ्या पत्नीऐवजी मी गेल्या चार ते पाच दिवसांपासून इथं येतोय." तसंच याबाबत विभाग प्रमुखांची परवानगी घेतल्याचं सरळ उत्तर संबंधित महिलेच्या पतीनं स्थानिक पत्रकारांशी बोलताना दिलं. धक्कादायक बाब म्हणजे, या काळात महिलेच्या पतीनं एका दिवसात तब्बल दहा ते पंधरा दाखले वाटप केलेत.
विभागप्रमुखांची प्रतिक्रिया : "कर्मचारी महिला जेवणाला गेल्यामुळं तिनं तिच्या ऐवजी तिच्या पतीला काम करायला सांगितलं. मात्र, या दरम्यान त्यांनी कुठलेही दाखले दिलेले नाही", असं स्पष्टीकरण जन्म मृत्यू नोंद विभागाचे विभागप्रमुख डॉ. घोलप यांनी दिलय. तसंच यापुढं कर्मचाऱ्यांनी गणवेशात यावं. जेणेकरून बाहेरचा कोण आणि कर्मचारी कोण हे कळेल, अशी सारवासारव देखील त्यांनी यावेळी बोलताना केली. तर "संबंधित प्रकाराचा अहवाल आणि स्थळ निरीक्षण अहवाल मागवण्यात आलाय. हा अहवाल आयुक्तांना पाठवण्यात येईल. त्यानंतर विभाग प्रमुख, संबंधित महिला आणि तिच्या पतीवर कायदेशीर कारवाई केली जाईल", असं महापालिका उपायुक्त अश्विनी गायकवाड यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- धावत्या रुग्णवाहिकेनं अचानक पेट घेतल्यानं ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, पाहा थरारक व्हिडिओ
- भुसावळ हादरलं! माजी नगरसेवक संतोष बारसेंसह सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या - Firing In Bhusawal
- Jalgaon News : तपासाकरिता जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकावर काळाचा घाला, वाहनावर झाड कोसळल्याने एपीआयसह चालकाचा मृत्यू