छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ISIS Module Case : राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) छत्रपती संभाजीनगरात इसिस मॉड्यूल प्रकरणात अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर एका आरोपीला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे. हर्सूल भागात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी एका ग्राफिक्स डिझायनरला अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या आधीही अशाच प्रकारच्या कारवाई शहरात झाल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यात काही प्रमाणात इसिसचे धागेदोरे असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
नऊ ठिकाणी छापेमारी : केंद्रीय तपास यंत्रणांनी गुरुवारी (15 फेब्रुवारी) शहरात येऊन कारवाई केली आहे. एनआयएच्या पथकांनी छत्रपती संभाजीनगर येथील नऊ ठिकाणी एकाच वेळी विविध संशयितांच्या घरांवर छापे टाकले. या प्रकरणाशी संबंधित अनेक इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि गुन्हेगारी कागदपत्रे जप्त केली आहेत. मोहम्मद जोहेब खान नावाच्या एका व्यक्तीला कारवाईदरम्यान अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे.
सप्टेंबरमध्ये झाली होती बैठक : सप्टेंबर 2023 मध्ये देशात घातपात घडवण्याच्या उद्देशानं छत्रपती संभाजीनगर शहरात 'इसिस' समर्थकांची एक बैठक घेण्यात आली होती. तेलंगणा पोलिसांना याबाबत काही पुरावे हाती लागले होते. त्यानुसार इसिस संघटनेच्या कट्टर समर्थकांची महत्त्वपूर्ण बैठक सप्टेंबर महिन्यात शहरातील एका ठिकाणी पार पडली. त्याचा व्हिडिओ तेलंगणा पोलिसांच्या हाती लागला होता. त्याबाबत तपासणी केली असता, उत्तर प्रदेशात जानेवारी महिन्यात घातपात घडवण्याबाबत चर्चा झाली. हे सर्व पुरावे तातडीनं उत्तर प्रदेश एटीएसकडे देण्यात आले. त्यावर एटीएसनं तपास केला असता, संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागातील 11 जणांचा सहभाग असल्याचं आढळून आला. त्याबाबत शहरात पथक दाखल झालं. त्यांनी झाडाझडती घेत प्राथमिक कारवाईदेखील केली.
हेही वाचा -
- Pune ISIS Module Case : साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा रचला होता कट ; पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात धक्कादायक माहिती
- ISIS Module Case : इसिस प्रकरणात आरोपपत्र दाखल; 69 दिवसांची मुदतवाढ एनआयए न्यायालयानं फेटाळली
- Pune ISIS Module Case: पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात एनआयएला मोठं यश, आठव्या आरोपीला अटक