छत्रपती संभाजीनगर International Yoga Day 2024:भारतानं जगाला आजपर्यंत अनेक गोष्टी दिल्या आहेत. त्यात योगसाधना महत्त्वाचा भाग मानला जातो. पारंपारिक काळापासून योग हा सर्वसामान्यांच्या आरोग्यविषयी महत्त्वाचा भाग आहे. मागील दहा वर्षापासून भारत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करतोय. त्यामुळं जगाच्या पाठीवर आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे, हे सर्वसामान्यांना कळतंय. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे प्रयोग देशात केले जात आहेत. त्यातच छत्रपती संभाजीनगर विभागात पहिल्यांदाच दिव्यांग मुंलासाठी योगचा विशेष सराव सुरू करण्यात आलाय. योग प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे गेल्या अनेक वर्षांपासून योग प्रशिक्षक म्हणून काम करत असून त्यांनी विशेष उपक्रम म्हणून मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत.
दिव्यांग मुलांसाठी विशेष प्रशिक्षण : योग भारतानं जगाला दिलेलं एक वरदान आहे. प्राचीन काळापासून स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी या योगभ्यासाचा फायदा झालाय. जगानं देखील ते मान्य केलं आहे. मानसिक, शारीरिक स्वास्थ चांगलं ठेवण्यासाठी योग उपयुक्त ठरतोय. त्यामुळंच दिव्यांग मुलांना त्याचा फायदा व्हावा, याकरिता पहिल्यांदाच योग प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे तसंच आरंभ संस्था यांच्या माध्यमातून योग प्रशिक्षण सुरू करण्यात आला आहे. दिव्यांग मुलांना शारीरिक स्वास्थासोबतच मानसिक स्वास्थ जपण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. यात अनेक जण तर स्वतःच्या हातानं कामही करू शकत नाहीत. अशाच मुलांना योग साधनेनं सक्षम करण्याकरता हा उपक्रम राबवला जातोय. मराठवाड्यात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग समजला जातोय. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित साधून आरंभ संस्थेत असलेल्या दिव्यांग मुलांसाठी हा विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. योगसधनेनं शारीरिक स्वास्थ तर चांगलं राहीलच मात्र, त्यांचे मानसिक स्वास्थ देखील चांगलं ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास योग प्रशिक्षक डॉ. उत्तम काळवणे यांनी व्यक्त केला.