महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आदिवासी तरुणाचा अमेरिकेत झेंडा; मायक्रोसॉफ्टमध्ये डाटा सायंटिस्ट म्हणून निवड, गलेलठ्ठ पगारासह मिळालं ग्रीन कार्ड - Youth Success Story - YOUTH SUCCESS STORY

Youth Success Story : पालघरमधील एका युवकानं आपल्या मेहनतीच्या जोरावर अमेरिकेत झेंडा फडकवलाय. मायक्रोसॉफ्ट कंपनीत त्याची डाटा सायंटिस्ट म्हणून निवड झालीय.

Youth Success Story
आदिवासी युवकाचा अमेरिकेत झेंडा; मायक्रोसॉफ्टमध्ये डाटा सायंटिस्ट म्हणून निवड, रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपेक्षाही जास्त पगार

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 7:29 AM IST

Updated : Apr 20, 2024, 7:40 AM IST

पालघर Tribal Youth Success Story : उच्चपदापर्यंत पोहोचण्यासाठी गरिबी आड येत नाही. परिस्थिती कशी असली, तरी तिच्यावर मात करुन ध्येय गाठता येतं. असाध्य ते साध्य करता येतं, हे डहाणू तालुक्यातील एका आदिवासी तरुणानं दाखवून दिलंय. महेश सूरज गोरात असं या तरुणाचं नाव आहे. या युवकाचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जातंय.

40 लाखांहून अधिक पगार : डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेला आणि कासा येथील माध्यमिक शाळेत शिक्षण घेऊन नंतर महाविद्यालयीन शिक्षणात बीएस्सी (आयटी) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर महेशच्या डोक्यात वेगळं काहीतरी करण्याचा मानस होता. पुढं त्यानं पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात एम. एस्सी करत असतानाच मायक्रोसॉफ्ट कंपनीत त्याची डाटा सायंटिस्ट म्हणून निवड झालीय. इतकंच नव्हे तर महेशमधील गुणवत्ता हेरुन बिल गेटस्‌च्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत त्याला तब्बल 43 लाख 77 हजार रुपये पगार मिळाला. याशिवाय जॉइनिंग बोनस म्हणून वीस लाख रुपये दिले आहेत. शिवाय दरवर्षाला वेगळं पॅकेजही मिळणार आहे. घरात कोणीही शिकलेलं नसताना आणि मार्गदर्शन नसताना, गरिबी पाचवीला पूजलेली असताना केवळ एका ध्येयानं प्रेरित होऊन त्या ध्येयाचा पाठलाग करण्यासाठी अतोनात कष्टाची तयारी महेशनं ठेवली होती. त्यासाठी त्याला त्याच्या शिक्षकांची मदत झाली.



आयुष्याच्या वेगळ्या वाटेवर :दुर्गम, आदिवासी भागातील मुलंही संधी मिळाली, की असाध्य ते साध्य करु शकतात, हे महेशनं आपल्या ध्येयपूर्तीतून दाखवून दिलंय. त्याला आयुष्यात व्हायचं वेगळंच होतं, परंतु एका वेगळ्या टप्प्यातून मायक्रोसॉफ्टनं त्याला दिलेली संधी त्याला दुसऱ्या दिशेनं घेऊन गेली. परंतु त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. त्याचं डाटा विश्लेषणातील ज्ञान आणि त्याची हुशारी लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्ट कंपनीनं केवळ त्याला नोकरी दिली नाही, तर अमेरिकेचं ग्रीन कार्डही दिलं. वर्षानुवर्षी अमेरिकेत राहणाऱ्यांनाही सहजासहजी असं ग्रीन कार्ड मिळत नाही.

राष्ट्रपतींनी दिल्लीला बोलवून केला सन्मान : एक आदिवासी मुलगा डहाणू तालुक्यातून येतो आणि तो अमेरिकेच्या एका मोठ्या कंपनीत उच्च पदाची नोकरी मिळवतो, यामुळं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत बोलावून त्याचं कौतुक केलं. त्याचा सत्कार केला. डहाणू येथील आदिवासी प्रकल्प विभागाचे सत्यम गांधी आणि अन्य सहकाऱ्यांनी महेशचा सत्कार केला. नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ग्रामीण भागातील मुलांनी यशाचा झेंडा रोवला असताना आदिवासी दुर्गम भागातून आलेल्या मुलानं यशाची एक वेगळीच वाट इतरांना दाखवली असून त्याचं हे यश निश्चितच अनेक आदिवासी दुर्गम भागातील मुलांना प्रेरणादायी ठरेल.

हेही वाचा :

  1. दुर्मिळ 'सेरेब्रल पाल्सी' आजारानं ग्रस्त रुद्रनं जिंकलं राष्ट्रीय सुवर्ण पदक; कसा आहे रुद्रचा प्रेरणादायी प्रवास? - Cerebral Palsy
  2. प्रेरणादायी! कॅन्सरग्रस्त दांपत्यानं पेन्शनच्या पैशातून वीटभट्टी आदिवासी मजुरांच्या लेकरांसाठी सुरु केली वस्ती शाळा
Last Updated : Apr 20, 2024, 7:40 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details