मुंबई Akshay Shinde Encounter Case: बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याच्या एन्काऊंटर प्रकरणी राज्य सरकारनं चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन केला आहे. निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील या आयोगानं तीन महिन्यात अहवाल सादर करावा, असे निर्देश सरकारनं दिले आहेत.
लैंगिक अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदेचा एन्काऊंटर : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस चकमकीत 23 सप्टेंबर 2024 रोजी मृत्यू झाला. अक्षय शिंदेला कोर्टातून घेऊन जात असताना मुंब्रा येथे ही घटना घडली. या घटनेबाबत घडलेल्या सर्व घटनांचा क्रम, तसंच आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर कसा झाला, याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी आता राज्य सरकारनं न्यायिक आयोग स्थापन केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल : आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबईतील वकील घनश्याम उपाध्याय यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेत उपाध्याय यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक नेमण्यात यावं, अशी मागणी केली आहे. या एसआयटीकडून एन्काऊंटर प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं, असंही त्यांनी याचिकेत म्हटलंय.
एक सदस्यीय आयोगाची स्थापना : राज्य सरकारनं या संदर्भात चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली आहे. सरकारच्या चौकशी आयोगाकडून अधिनियम 1952 अंतर्गत हा तपास केला जाणारा असून या संदर्भातील अहवाल या आयोगानं तीन महिन्यात सादर करावा, असे निर्देश राज्य सरकारनं याबाबत काढलेल्या अधिसूचनेत दिले आहेत.
हेही वाचा -
- अखेर सहा दिवसांनी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन; स्थानिकांनी केला विरोध - Akshay Shinde Body Buried
- अक्षय शिंदेला दफन करण्यासाठी जागा शोधा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश - Akshay Shinde Encounter Case
- शिंदेनं झाडलेल्या इतर दोन गोळ्या गेल्या कुठे? न्यायालयाचा सवाल; पोलीसही येणार आरोपीच्या पिंजऱ्यात? - Akshay Shinde Encounter Case