मुंबई - सध्या सर्वत्र हवामान बदलाच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवेत गारवा वाढल्याने श्वसनाशी निगडित रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येतंय. विशेष म्हणजे यात संसर्गजन्य संसर्गाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अशातच राज्याच्या आरोग्य विभागाने इन्फ्ल्युएंझा-ए या विषाणूशी संबंधित मागील 11 महिन्यांतील रुग्णांचा अहवाल प्रसिद्ध केला असून, या अहवालानुसार राज्यात या विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आलंय. यातील महत्त्वाची बाब म्हणजे या आजारामुळे 11 महिन्यांत तब्बल 57 जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जातेय.
विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागलाय :राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, मुंबईसह राज्यात इन्फ्ल्युएंझा-ए या विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याचं समजतंय. या विषाणूच्या एकूण तीन प्रकारांपैकी दोन प्रकार एक स्वाइन फ्लू आणि H3N2 या प्रकारातील रुग्ण शोधण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटलंय. या विषाणूच्या प्रादुर्भावात मुंबईत सर्वाधिक रुग्ण असल्याचे दिसून येते. त्यानंतर दुसरा नंबर पुण्याचा असून, नाशिक तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, मागील 11 महिन्यांत या विषाणूची तब्बल 2,325 जणांना लागण झाली असून, यात 57 जणांचा मृत्यू झालाय.
45 हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक लसींचे वाटप :राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेली आकडेवारी 1 जानेवारी 2024 ते 21 नोव्हेंबर 2024 या कालावधीतील असून, या आकडेवारीनुसार सर्वाधिक रुग्ण हे मुंबई आणि आसपासच्या विभागात आढळून आलेत. ज्याला आपण एमएमआर रिजन म्हणतो या एमएमआर विभागात सर्वाधिक म्हणजे 45 टक्के रुग्ण आढळून आलेत. या रुग्णांची एकूण संख्या एक हजार 55 इतकी आहे. मात्र, यातील जमेची बाजू म्हणजे या 11 महिन्यांत एमएमआर रिजनमध्ये या विषाणूच्या संसर्गाने एकही मृत्यू झालेला नाही. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये 45 हजारांहून अधिक प्रतिबंधात्मक लसींचे वाटप करण्यात आले असून, त्यापैकी 2,608 जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने म्हटलंय.
कोविडप्रमाणेच या आजाराची लक्षणे : या संदर्भात आम्ही डॉ. विनायक तायडे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, कोविडप्रमाणेच या आजाराची लक्षणे आहेत. हा स्वाइन फ्लू आजाराचा एक प्रकार आहे. त्याची सौम्य आणि गंभीर स्वरूपाची लक्षणे दिसून येतात. यात ताप येणे, खोकला लागणे, घसा दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब लागणे, उलट्या होणे अशी लक्षणे दिसून येतात. या आजाराने घाबरून न जाता लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या लक्षणांसोबतच तीव्र घसा दुखीचा त्रास किंवा घशाला सूज आली असल्यास काळजी घेणे आवश्यक आहे. ताप 98 सेल्सिअस डिग्रीपेक्षा जास्त असेल तर रुग्णांनी तात्काळ तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे: एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला असेल तर त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, यावर उपाय देखील आहेत. आजाराशी संबंधित रुग्णांनी आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवणे गरजेचे आहे. सोबतच संतुलित आहारदेखील गरजेचा आहे. त्यासोबतच दररोज व्यायाम करावा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. भरपूर पाणी प्यावे आणि वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यायला हवा. या आजाराशी संबंधित लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया राज्यपालांचे माजी राजवैद्य डॉ. विनायक तायडे यांनी दिलीय.
सावधान! राज्यात इन्फ्ल्युएंझा विषाणूचा प्रादुर्भाव, मागील 11 महिन्यांत 57 जणांचा मृत्यू, तर 2,325 जणांना लागण - MUMBAI MUNICIPAL CORPORATION
या अहवालानुसार राज्यात या विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आलंय. या आजारामुळे 11 महिन्यांत तब्बल 57 जणांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जातेय.
राज्यात इन्फ्ल्यूएंझा विषाणूचा प्रादुर्भाव (Source- ETV Bharat)
Published : Nov 27, 2024, 4:45 PM IST