मुंबई Ratan Tata Pet Project : उद्योगपती रतन टाटा यांनी देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. टाटांनी अनेक क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्याचा फायदा तळागळातील सामान्य लोकांना होत आहे. दरम्यान, आता पाळीव प्राणी पाळणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. रतन टाटा यांनी मुंबईत कुत्री, मांजरं, ससे आणि इतर लहान प्राण्यांसाठी 24 तास खुलं असणारं रुग्णालय बांधलं आहे. या रुग्णालयातून पाळीव प्राण्यांवर चोवीस तास उपचार घेता येणार आहे. यामुळं प्राणीप्रेमींनी आनंद व्यक्त केलाय.
2.2 एकर आणि 165 कोटी रुपये खर्च : उद्योगपती रतन टाटा यांना मुंबईत कोविडच्या आधी प्राण्यांसाठी रुग्णालय बांधायचं होतं. पण कोविडमुळं कामास विलंब झाला. कोविडकाळात रुग्णालयाचं बांधकाम थांबवावं लागलं होतं. यानंतर करार, कागदपत्रे आणि कागदपत्रांची पूर्तता या बाबींसाठी साधारण दीड वर्षांचा कालावधी लागला. आता या रुग्णालयाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील महालक्ष्मी येथील हे रुग्णालय 2.2 एकर जागेत पसरलेलं आहे. 165 कोटी रुपये रुग्णालय बांधण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत. 'टाटा ट्रस्ट्स स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल' असं या रुग्णालयाचं नाव आहे. तर साधारण 200 प्राणी राहतील एवढी क्षमता आहे.
चोवीस तास सेवा: सुरुवातीला हे रुग्णालय नवी मुंबईतील कळंबोली येथे होणार होतं. मात्र टाटांनी हे रुग्णालय मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी बांधण्याचा निर्णय घेतला. कारण पाळीव प्राण्यांच्या पालकांना मुंबईत येताना प्रवासासाठी लागणारा वेळ, वाहतूक कोंडी या बाबींचा विचार करुन दक्षिण मुंबईतील महालक्ष्मी येथे हे रुग्णालय बांधण्यात आलं असल्याचं रतन टाटांनी सांगितलं. तसंच मुंबईत पाळीव प्राण्यांच्या आपत्कालीन सेवांची गरज ओळखून हे रुग्णालय बांधलं आहे. पाळीव प्राणी जसे कुत्री, मांजरं, ससे आणि इतर लहान प्राण्यांसाठी भारतातील काही रुग्णालयं चोवीस तास सेवा देतात, त्यापैकी मुंबईतील हे एक रुग्णालय असणार आहे.