नाशिक Swami Shantigiri Maharaj : येथील लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून इच्छुक असलेले स्वामी शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. भाजपाचं पक्षश्रेष्ठींशी आमचं बोलणं झालं आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची चर्चा झाली आहे, असंही स्वामी शांतिगिरी महाराज यांनी म्हटलय. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत नाशिकच्या जागेवरून तिढा अद्यापही कायम असताना अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत स्वामी शांतिगिरी महाराज यांनी आघाडी घेतली आहे. महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढणार आणि जिंकणारच असा विश्वासही स्वामी शांतिगिरी महाराज यांनी व्यक्त केला आहे.
राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी निवडणूक लढवणार : दुसरीकडे जय बाबाजी भक्त परिवाराच्यावतीने महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांना नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभक्ती आणि राजकारणाच्या शुद्धीकरणासाठी महाराज निवडणूक लढवणार असल्याचं भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी सांगितले. नाशिक मतदारसंघात जय बाबाजी भक्त परिवाराची संख्या दोन लाखाहून अधिक आहे. तर स्वामी कंठानंद यांच्यासाठी नाशिकच्या काही उद्योजक, वैद्यकीय क्षेत्र, शेती आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून स्वामींच्या उमेदवारीसाठी साकडे घातले आहे.