मुंबई Increase in Dearness Allowance : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारनं आनंदाची बातमी दिली आहे. सरकारी कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही वाढ थकबाकीसह देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तसंच निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ थकबाकीसह मिळणार आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना खुश केलं आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील मिळणार लाभ : सातव्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2024 पासून मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 46 टक्क्यांवरुन वाढवून आता 50 टक्क्यांवर करण्यात आला आहे. हा महागाई भत्ता 1 जानेवारी, 2024 ते 30 जून, 2024 या कालावधीतील थकबाकीसह जुलैच्या वेतनासोबत रोखीनं देण्यात यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. सरकारी निवृत्तिीवेतन योजना लागू असलेल्या मान्यता तसंच अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषी/कृषेतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय लागू राहील. हा निर्णय जिल्हा परिषदाचे निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील, असं सरकारनं म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं केलं निर्णयाचं स्वागत : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्ता वाढ थकबाकीसह देण्याच्या शासन निर्णयाचं महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं स्वागत केलं आहे. महासंघानं याबाबत राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन लागू करणं तसंच अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात, राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली 10 जून रोजी तर मुख्यमंत्र्यांसोबत 28 जून रोजी अधिकारी महासंघाच्या बैठका झाल्या होत्या.