पुणे - Shocking incident in Baramati : बारामती तालुक्यातील निंबूत तेथे गुरुवारी मध्यरात्री अकराच्या सुमारास बैलाच्या व्यवहारावरून गोळीबार झाला आहे. प्रसिद्ध बैलगाडी शर्यत गाडीमालक गौतम काकडे यांच्याबरोबर झालेल्या वादात गौतम यांचा भाऊ गौरव याने फलटणच्या रणजीत निंबाळकर यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर वडगाव निंबाळकर पोलिसांनी गौरव काकडे गौतम काकडे या दोघांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात अंकिता रणजीत निंबाळकर (रा.स्वामी विवेकानंद नगर, फलटण) यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये गौतम शहाजी काकडे, गौरव शहाजी काकडे व तीन अनोळखी व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार एक वर्षांपूर्वी 'सर्जा' हा बैल निंबूत येथील गौतम काकडे यांच्याकडून 61 लाख रुपयांना रणजीत निंबाळकर यांनी विकत घेतला होता. त्यानंतर 24 जून 2024 रोजी रणजीत निंबाळकर यांच्याकडील सुंदर नावाचा बैल गौतम शहाजी काकडे यांनी 37 लाख रुपयांना विकत घेतला. यावेळी गौतम काकडे यांनी विसारापोटी पाच लाख रुपये दिले होते. उर्वरित 32 लाख रुपये 27 जून 2024 रोजी देऊन हा व्यवहार स्टॅम्पवर लिहून देण्याचे ठरले होते. व्यवहार करताना आपण समक्ष हजर होतो, असे रणजीत निंबाळकर यांच्या पत्नी अंकिता रणजीत निंबाळकर यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान व्यवहार झाला, त्याच दिवशी गौतम काकडे यांनी सुंदर हा बैल खटाव तालुक्यातील बुध येथून त्यांच्या घरी निंबूतला नेला.
27 जून 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास रणजीत निंबाळकर व संतोष तोडकर हे गौतम काकडे यांच्याकडे बैलाच्या व्यवहाराची चर्चा करण्यासाठी निंबूत येथे गेले होते. त्यांच्याशी चर्चा करून रणजीत निंबाळकर परत फलटण येथे दुपारी दोन वाजता पोहोचले, तेव्हा त्यांनी गौतम काकडे हे आपले बैलाचे राहिलेले पैसे न देता, तुम्ही स्टॅम्पवर सही करा असे म्हणत होते, मात्र मी पैसे दिल्याशिवाय सही करणार नाही असे म्हणून परत आलो आहे, असे त्यांनी सांगितल्याचे अंकिता निंबाळकर यांनी फिर्यादीत स्पष्ट केले आहे.
दरम्यान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास अंकिता निंबाळकर, रणजीत निंबाळकर, दहा महिन्यांची मुलगी अंकुरण, नातेवाईक वैभव भारत कदम आणि पिंटू प्रकाश जाधव हे चारचाकी गाडीतून निंबूत येथे निघाले होते. लोणंद येथे आल्यानंतर संतोष तोडकर हे थांबले होते. संतोष तोडकर हे रणजीत निंबाळकर यांना म्हणाले, सर, तुम्हाला या व्यवहाराचे पूर्ण पैसे दिले आहेत, तुम्ही सही का केली नाही? त्यावर रणजीत निंबाळकर यांनी आम्हाला फक्त पाच लाख रुपये मिळाले, बाकी पैसे अजून गौतम काकडे यांनी दिले नाहीत असे सांगितले.