मुंबई :फेब्रुवारी महिना आता जवळपास संपत आला आहे. त्यामुळे आता राज्यात उष्णतेची चाहूल लागण्यास सुरुवात झाली. थंडी अद्याप संपलेली नसताना देखील कोकणपट्ट्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत तीन ते पाच अंश सेल्सिअस उष्णतेत वाढ झाल्याची नोंद हवामान विभागानं केली आहे. त्यामुळे आज सोमवार 24 फेब्रुवारी आणि मंगळवार 25 फेब्रुवारी या दोन दिवसांसाठी हवामान विभागानं कोकणासह गोव्याला तापमानाचा येलो अलर्ट जारी केला आहे.
गोवा किनारी भागात कमाल तापमानाचा पारा वाढणार :याबाबत हवामान विभागाच्या मुंबई मंडळातील शास्त्रज्ञ सुषमा नायर यांनी दिलेल्या माहितीनुसार, "राज्यात आता अवकाळी पावसाचं संकट दूर झालं आहे. पुढील काही दिवस हवामान उष्ण व कोरडं राहणार असून, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह गोव्यात पारा सामान्य तापमानाच्या तुलनेत तीन ते पाच अंश सेल्सिअसनं अधिक राहणार आहे. मागील काही दिवस मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात कमाल तापमानाचा पारा एक ते तीन अंश सेल्सिअसनं वाढलेला पाहायला मिळाला. तर, पुढचे दोन दिवस म्हणजे 24 व 25 फेब्रुवारी रोजी मुंबई, ठाणे शहरासह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह गोवा किनारी भागात कमाल तापमानाचा पारा तीन ते पाच अंश सेल्सिअसनं अधिक राहणार आहे.