नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकाणी पोलीस कारवाईत लाखो रुपयांची अवैध रक्कम सापडलीय. विशेष म्हणजे नाशिक-मुंबई महामार्गावरील कसारा घाटाच्या पायथ्याशी पोलिसांनी नाकाबंदी केली असता वाहन तपासणीदरम्यान एका वाहनातून तब्बल 2 कोटींचे घबाड मिळाल्याने एकच खळबळ उडालीय. यावेळी पोलिसांनी रोख रकमेसह वाहन ताब्यात घेतलंय. तसेच नाशिकमधील दोन कारवाईत पोलिसांनी 31 लाख 50 हजारांची अवैध रक्कम जप्त केलीय.
2 कोटींची रक्कम सापडली: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलीस चौकीजवळ स्थानिक पोलिसांनी वाहन तपासणीसाठी नाकाबंदी केली होती. यावेळी नाशिकहून मुंबईकडे जाणारी (एमएच-11-बीव्ही-9708) या वाहनाची तपासणी केली असता, त्यात 2 कोटींची रक्कम आढळून आलीय. भरारी पथकाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, प्रभारी पोलीस अधिकारी सुनील बच्छाव आणि निवडणूक भरारी पथक आणि टीमकडून पुढील तपास सुरू आहे.
नाकाबंदीत 31 लाख जप्त :नाशिक शहर पोलिसांनी केलेली नाकाबंदी आणि गोपनीय माहितीनुसार उपनगरसह सातपूरमध्ये बेहिशेबी रक्कम जप्त करण्यात आलीय, उपनगरात बिगारी कामगाराच्या घरातून 11 लाख, तर सातपूरमध्ये नाकाबंदीवेळी वाहनातून 20 लाख 50 हजार रुपये, असे एकूण तब्बल 31 लाखांची अवैध रोकड जप्त करण्यात आलीय, यात 500, 200 आणि 100 रुपयांचं बंडल स्वरूपातील ही रक्कम पोलिसांनी जप्त केलीय. बिगारी कामगार करणारे व्यक्तीच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळालीय, त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या पथकाने संशयित ऋषिकेश वानखडे यांच्या घरी पोहोचून त्यांच्या घराच्या झडतीत 11 लाख रुपयांची रोख रोकड पोलिसांना सापडली, त्यानुसार संशयिताला ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.
पोलिसांना गस्त वाढवण्याच्या सूचना: सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेहिशेबी रकमेसंदर्भात तपास सुरू आहेत. दोन्ही संशयितांची चौकशी करून त्यांनी रक्कम कुठून आणि कोणत्या कारणास्तव आणली, याबाबत तपास करीत आहेत. यासह विविध ठिकाणी नाकाबंदीसह पोलीस ठाणे हद्दीत गोपनीय गस्त वाढवण्याच्या सूचना पथकांना केलीय, असंही पोलीस उपायुक्त मोनिका राऊतांनी सांगितलंय.
हेही वाचा -
- भाजपाचा मुख्यमंत्री अन् मनसे सत्तेत असेल, राज ठाकरे आताच असं का म्हणाले?
- मतदारसंघ 21 आणि उमेदवार 1272, 'या' मतदारसंघात तर तब्बल 99 उमेदवार रिंगणात