कोल्हापूर -हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आज मी सी. पी. राधाकृष्णन म्हणून तुमच्या समोर नसतो, असं वक्तव्य राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलंय, कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या 61 व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षीय भाषणात सी. पी. राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. शिवरायांच्या शौर्यामुळे आपण सर्वजण आहोत, ते केवळ महाराष्ट्राचे राजे नव्हते, तर अखंड भारताचे राजे होते, छत्रपतींचा विचार घेऊनच विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण केलं पाहिजे, असा कानमंत्र पदवी ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिलाय.
कोल्हापूर ही महालक्ष्मी अंबाबाईची पवित्र भूमी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या 61 व्या वार्षिक दीक्षांत समारंभात तुमच्यासोबत उपस्थित राहताना मला खूप आनंद होतोय. आजच्या दीक्षांत समारंभात पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो. राष्ट्रपती सुवर्णपदक, कुलपती सुवर्णपदक आणि पीएचडी मिळालेल्या विद्यार्थ्यांचे मी विशेषतः अभिनंदन करतो. आज पदवी प्राप्त करणाऱ्या काही पदवीधर विद्यार्थ्यांचे त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील पदवीधर असू शकतात. मी त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे विशेष कौतुक करतो, असंही सी. पी. राधाकृष्णन म्हणालेत.
सुंदर पुतळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतिक :या विद्यापीठाला दिलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि विद्यापीठ परिसरात स्थापित केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपूर्ण जीवनाची आठवण करून देतो. मी फक्त 6 वर्षांचा असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाबद्दल शिकलो. छत्रपती शिवाजी महाराजांनी वेल्लोर, तंजावर, गिंजी (सेनजी) आणि तामिळनाडूतील इतर काही ठिकाणी भेट दिली होती हे ऐकून आम्हाला अभिमान वाटला. कोल्हापूर ही महान शासक छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे, जे देशभरात शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, विशेषतः सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समुदायांमध्ये प्रगतिशील धोरणांसाठी ओळखले जातात. त्यामुळे तुम्ही धैर्य, सामाजिक न्याय आणि जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्टतेच्या महान वारशाचे भाग्यवान वारसदार आहात हे मला जाणवले, असंही राधाकृष्णन यांनी अधोरेखित केलंय.
शिवाजी विद्यापीठाशी 299 संलग्न महाविद्यालये : शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1962 मध्ये झाली. तेव्हा विद्यापीठाशी संलग्न फक्त 34 महाविद्यालये होती. उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी फक्त 14 हजार होते. आज शिवाजी विद्यापीठाशी 299 संलग्न महाविद्यालये आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या 2.5 लाखांपर्यंत पोहोचलीय. तथापि, आपण आत्मसंतुष्ट राहू शकत नाही. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2036 पर्यंत आपल्या उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण नोंदणी प्रमाण 50 टक्के साध्य करण्याचा प्रयत्न करते. म्हणून आपल्याला गुणवत्ता आणि उत्कृष्टता राखून संख्यात्मक विस्ताराची आवश्यकता असल्याचेही राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यावेळी म्हणाले. पदवीदान सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक आशिष लेले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के उपस्थित होते, यावेळी 14 हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली, यंदा प्रथमच विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर इंग्रजी आणि मराठी भाषेत विद्यार्थ्यांच्या नावांचा उल्लेख असणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
प्रथमच विद्यार्थ्यांना मोबाईलवर मिळणार पदवी :आज झालेल्या दीक्षांत समारंभात 14 हजार 269 विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभात पदवी प्रदान करण्यात आली, तर 37 हजार 223 विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे घरपोच पदवी मिळणार आहे. शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने यंदा प्रथमच डिजिलॉकरद्वारे विद्यार्थ्यांना थेट मोबाईलवर पदवी मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिलीय.
हेही वाचा :
- अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता पण. .: अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?
- गुजरातचं ड्रग्ज कनेक्शन परळीत, सुरेश धस यांचा जनआक्रोश मोर्चात सनसनाटी आरोप